Latest

स्वस्तात घर देतो सांगून कोट्यवधींची फसवणूक

अनुराधा कोरवी

जेएनपीए ः पुढारी वृत्तसेवा :  उरण तालुक्यातील जासई गावातील जनाबाई चव्हाण या महिलेने स्वस्तात घर देतो म्हणून सांगून परिसरातील 15 हून अधिक नागरिकांची एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून महिलेस अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

उरणमध्ये घन:श्याम राजपाल, अधवान, कल्पतरू, पेण अर्बन बँक घोटाळा त्यानंतर दुप्पट पैशाचे आमिष दाखवून सतीश गावंड, सुप्रिया पाटील आदींनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही उरणमधील जनता वेगवेगळ्या अमिषाला बळी पडत चालली आहे. स्वस्तात रूम देतो असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उरणमध्ये उघड झाली आहे.
तालुक्यातील जासई गावात अनेक वर्षांपासून भाड्याच्या रुममध्ये रहाणार्‍या जनाबाई रमेश चव्हाण या आपल्या कुटूंबासह रहात होत्या. सदर महिलेने आपण बिल्डरच्या जवळ काम करीत असल्याचे सांगून स्वस्तात रूम देतो असे आमिष दाखविण्यास सुरुवात केली. या आमिषाला बळी पडत अनेकांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

पैसे गुंतवणूक करूनही मुदत संपूनही रूम मिळत नसल्याने व सदर महिलाही बेपत्ता झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले.
याबाबत उरण पोलीस ठाण्यात भारती म्हात्रे व सुलोचना घरत यांनी तक्रार पत्र दिले होते. यानंतर फसवणूक करणारी महिला आरोपी जनाबाई रमेश चव्हाण हिला 29 फेब्रुवारी 2024 रोजी उरण पोलिसांनी अटक केली आहे. जनाबाई चव्हाण हिच्या विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये 420 व 407 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देवरे करीत आहेत.

दरम्यान, मागील काळामध्ये उरण तालुक्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचेे पैस अडकून पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT