पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत सलग दोन वेळा जगजेतेपद कायम ठेवण्याची 'विक्रमी' कामगिरी आजवर केवळ दोनच संघांना करता आली आहे. यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघाला ही संधी मिळाली आहे. ( FIFA WC and France )
१९३० मध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला. आजवर विश्वचषक स्पर्धा २१ वेळा झाली आहे. यामध्ये केवळ दोनच संघाना सलग दोनवेळा विश्वविजेतेपद आपल्याकडे राखण्यात यश मिळाले आहे. सर्वप्रथम ही विक्रमी कामगिरी करण्यात इटलीच्या संघाला यश मिळाले होते. या संघाने १९३४ आणि १९३८च्या फुटबॉल वर्ल्ड कप सलग जिंकत नवा विक्रम घडविला होता. यानंतर असा विक्रम पाहण्यासाठी तब्बल २४ वर्ष वाट पाहावी लागली होती.
ब्राझीलच्या संघाने सर्वप्रथम १९५८ मध्ये फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. यानंतर सलग दुसर्या विश्वचषक स्पर्धेत म्हणजे १९६२मध्ये ही ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवण्यात ब्राझीलच्या संघाला यश मिळाले होते.
२०१८ मध्ये फ्रान्सच्या संघाने अविस्मरणीय कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होते. यंदाच्या स्पर्धेतही हा संघ सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. फ्रान्सकडे या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा किलियन एमबाप्पे आहे. तसेच गोल करण्यासाठी असिस्ट करणारा ॲटोनी ग्रीझम याचाही दबदबा कायम आहे. फ्रान्सच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ अशी ओळख असणार्या इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे यंदा जेतेपदाची सर्वाधिक संधी फ्रान्सला आहे असे मानले जात आहे.
विशेष म्हणजे मागील तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये गतवेळेचे विजेते हे पहिल्या फेरीतच बाद झाले होते. २०१०ला इटली, २०१४ ला स्पेन तर २०१८ ला जर्मनी संघ पहिल्याच फेरीत बाद झाले. त्यामुळे १९९८ नंतर प्रथमच गतविजेता संघाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली आहे. आता उर्वरीत दोन सामने जिंकले तर फ्रान्स नवा इतिहास घडवेल. सलग दोनवेळा जगजेता होण्याबरोबरच फ्रान्सचा हा तिसरा विश्वचषक ठरेल.
हेही वाचा :