FIFA World Cup : फिफा वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व लढती, क्रोएशिया-ब्राझील, तर नेदरलँड- अर्जेंटिना आज लढत | पुढारी

FIFA World Cup : फिफा वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व लढती, क्रोएशिया-ब्राझील, तर नेदरलँड- अर्जेंटिना आज लढत

दोहा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत (FIFA World Cup) उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींचा थरार आता रंगणार आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या आठ देशांपैकी पाच देश हे युरोप खंडातील आहेत. यामध्ये क्रोएशिया, नेदरलँड, पोर्तुगाल, इंग्लंड व फ्रान्स या बलाढ्य देशांचा समावेश आहे. यामधील दोन देश हे दक्षिण अमेरिकेतील आहेत. ब्राझील व अर्जेंटिना या देशांचा त्यामध्ये समावेश आहे. आफ्रिका खंडातील एकमेव देश मोरोक्कोच्या रूपात यावेळी दिसत आहेत. मोरोक्कोचे यश वाखाणण्याजोगे आहे.

युरोपचीच मक्तेदारी (FIFA World Cup)

2002 मध्ये ब्राझीलने विश्वकरंडक जिंकला होता, पण त्यानंतर 2006 मध्ये इटली, 2010 मध्ये स्पेन, 2014 मध्ये जर्मनी व 2018 मध्ये फ्रान्सने विश्वकरंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवली होती. यंदाही युरोप खंडातील पाच देश उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे सलग पाचव्यांदा युरोप खंडातील देशांकडेच फिफा वर्ल्डकप अधिक वेळ आहे.

दक्षिण अमेरिकन संघांची दावेदारी

ब्राझील, अर्जेंटिनाही दावेदार दक्षिण अमेरिकन खंडातील देशांनी विश्वकरंडक जिंकून 20 वर्षे उलटून गेली. ब्राझीलने 2002 मध्ये; तर अर्जेंटिनाने 1986 मध्ये जागतिक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. हे दोन्ही देश जेतेपदावर हक्क सांगण्यासाठी आतूर झाले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये हे दोन्ही संघ कशी कामगिरी करताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मोरोक्को इतिहास रचणार?

मोरोक्को हा आफ्रिकन खंडातील देश. आफ्रिकन खंडामधून कॅमेरून, सेनेगल व घाना या तीन देशांनंतर मोरोक्कोने फिफा विश्वकरंडकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे; मात्र कॅमेरून, सेनेगल व घाना यांच्यापैकी एकाही देशाला पुढे जाऊन उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठता आलेली नाही. मोरोक्कोचा संघ इतिहास रचतो का, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button