Latest

ParamBir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

दीपक दि. भांदिगरे

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (ParamBir Singh) अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह यांना कोर्टाने फरार घोषित केले होते. ते गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. पण अखेर ते मुंबईत दाखल झाले आहेत.

भ्रष्टाचारांचे आरोप असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता. परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते. याप्रकरणी ६ डिसेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणी दरम्यान परमबीर सिंह हे भारतातच आहेत, अशी माहिती त्यांचे वकील पुनीत बाली यांनी न्यायमूर्ती एसके कौल यांच्या खंडपीठाला दिली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यास ४८ तासांमध्ये सिंह हे सीबीआय समक्ष हजर होतील, असेही बाली यांनी खंडपीठाला सांगितले होते.

दरम्यान, आज परमबीर सिंह (ParamBir Singh) मुंबईत दाखल झाले. १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केल्यापासून ते बेपत्ता होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल यांची न्यायालयीन चौकशी आयोग म्हणून नियुक्‍ती केली आहे. या चौकशी आयोगाने परमबीर सिंग यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले. परंतु परमबीर काही फिरकले नाहीत. सतत दांड्या मारल्याने चांदिवाल आयोगाने परमबीर यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतरही परमबीर हजर झालेले नव्हते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एस टी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीला जबाबदार कोण? | गोपीचंद पडळकर

SCROLL FOR NEXT