Latest

योगींची खुर्ची जाणार? ‘हे’ होणार नवे मुख्यमंत्री; भाजपच्या माजी खासदाराचे धक्कादायक वक्तव्य

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: यूपी विधानसभा निवडणूक: भाजपचे माजी खासदार हरिनारायण राजभर यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, यूपी भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा हे उत्तर प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. ए. के. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. हरिनारायण राजभर 2014 मध्ये मऊ येथील घोसी येथून खासदार होते. त्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या शेजारी ए. के. शर्मा दिसत आहेत.

राजभर हे जेव्हा ही घोषणा करत होते तेव्हा शर्मा काहीच बोलले नाहीत. हा व्हिडिओ 4 जानेवारी रोजी मऊ येथे बनवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये हरिनारायण म्हणाले की, आगामी काळात ए. के. शर्मा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. मंचावरून आपल्या वक्तव्यात राजभर म्हणाले, 'शर्माजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. मी त्यांच्यासाठी काम करेन, मी माझ्या राज्यासाठी काम करेन. यासाठी मी शपथ घेतो.

कोण आहेत ए. के. शर्मा

ए. के. शर्मा हे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी 14 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. ते त्यांचे सचिव होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते पीएमओमध्ये सहसचिव म्हणून रुजू झाले होते.

1962 मध्ये उत्तर प्रदेशातील मऊ येथे जन्मलेल्या ए. के. शर्मा यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या मूळ जिल्ह्यातून घेतले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. 1988 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. गुजरात केडरमध्ये शर्मा यांची पहिली पोस्टिंग उपविभागीय दंडाधिकारी म्हणजेच एसडीएमची होती. 1995 मध्ये त्यांनी मेहसाणाचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. 2001 मध्ये शर्मा नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून रुजू झाले आणि 2014 पर्यंत एकत्र राहिले.

शर्मा यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात की ते खूपच लो प्रोफाइल आहेत. गुजरातमध्ये परदेशी गुंतवणूक आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्हायब्रंट गुजरात समिटचे कामही शर्मा यांनी हाताळले होते. 2008 मध्ये टाटाचा नॅनो प्लांट बंगालमधून गुजरातला आणण्यात शर्मा यांची महत्त्वाची भूमिका होती.

SCROLL FOR NEXT