Latest

Food Adulteration : खाद्यान्नातील भेसळ जीवघेणी ! जाणून घ्या भेसळ कशी ओळखावी?

सोनाली जाधव

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रकारच्या खाद्यान्नामध्ये भेसळीला जणूकाही उधाण आले आहे. अन्न-औषध विभागाच्या कारभारातही 'भेसळ'च दिसून येत असल्यामुळे भेसळ बाजार दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. (Food Adulteration)

Food Adulteration : अशी करतात भेसळ…

धान्ये, कडधान्ये, भाजीपाला, चहा पावडर, मिरची पावडर, फरसाणा, चिवडा, चकली, लाडू, बिस्किटे, चॉकलेट, गोळ्या यासह लोकांच्या दैनंदिन आहारातील सगळ्या पदार्थांना भेसळीने ग्रासले आहे. ही भेसळ कधी कधी जीवघेणीही ठरत आहे. धान्यामध्ये बार्शीची ज्वारी ही कारज्वारी म्हणून प्रसिद्ध आहे; मात्र आजकाल चक्क हायब्रीड ज्वारी गळ्यात मारली जात आहे. तुरीची डाळ म्हणून लाख नावाच्या पशुखाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कडधान्याची डाळ विकली जात आहे. साजूक तुपात चक्क रवा मिसळण्यात येतो, तर लोण्यामध्ये डालडा मिसळण्याचे उद्योग सुरू आहेत. चहाच्या पावडरीमध्ये लाकडाचा भुसा किंवा वापरून टाकून दिलेली पावडर मिसळण्याचे प्रकार घडत आहेत. बेसणच्या पिठात भलतेच कसले तरी पीठ मिसळलेले आढळते.

कडधान्यांना आणि डाळींना कृत्रिम रंग देऊन त्या आकर्षक बनविल्या तयार जातातात. मिरची पावडरमध्ये चक्क  लाकडाचा भुसा आणि माती मिसळण्यासारखे प्रकार घडत आहेत. फरसाणसारख्या तळीव पदार्थांना खुसखुशीतपणा येण्यासाठी त्यामध्ये चक्क कपडे धुण्याचा सोडा वापरण्याच्या घटना आढळून येत आहेत. खाद्य पदार्थांच्या बाबतीत बाजारात आजकाल भेसळ नसलेला प्रकार सापडणे मुश्कील झाले आहे.

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे हिताचे…

भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गेल्यानंतर ग्राहकाचे लक्ष असते ते ताज्या भाज्यांवर; मात्र आपण घेतलेली भाजी खरंच ताजी असेल याची खात्री देता येत नाही. कारण, हिरव्या मिरच्या, पालेभाज्या, फळभाज्या या नेहमी ताज्यातवाण्या दिसण्यासाठी 'मेलॅचिट ग्रीन' या रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात येतो. या रसायनाच्या पाण्यात पालेभाज्या आणि फळभाज्या बुडवून ठेवल्या की दिवसभर हिरव्यागार आणि ताज्या दिसतात. धान्य अथवा भाजीपाल्यामध्ये होणारी भेसळ ही प्रामुख्याने काही व्यापारीवर्गाकडून होते. त्यामुळे धान्य किंवा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणे हिताचे ठरते.

Food Adulteration : भेसळ ठरतेय जीवघेणी !

वेगवेगळ्या खाद्य पदार्थांमध्ये नेमकी कशी भेसळ होते, ते खाल्ल्यानंतर शरीरावर काय विपरीत परिणाम होतात, याची माहितीसुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी करून घेण्याची गरज आहे. आजकाल शहरांपासून ते पार खेड्यापाड्यांपर्यंत सर्वत्र 'चायनीज फास्टफूड' पदार्थांची चांगलीच चलती आहे. हे चायनीज पदार्थ चवीलाही मस्त लागतात; मात्र या चायनीज पदार्थांमध्ये मसाला म्हणून जे जे काही पदार्थ वापरले जातात, त्यातील बहुतांश पदार्थ ही वेगवेगळ्या स्वरूपाची रसायने आहेत आणि ती शरीराला अत्यंत घातक आहेत.

खाते भेसळ रोखण्यासाठी नेमके करते तरी काय ?

भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी शासनाने कित्येक कायदे केलेले आहेत. जीवघेण्या स्वरूपाच्या भेसळीसाठी जन्मठेपेसारख्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. मात्र या कायद्याची आवश्यक त्या प्रमाणात अंमलबजावणी होताना दिसत नाही. अन्नातील भेसळ रोखण्यासाचे 'अन्न आणि औषध प्रशासन' विभागातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तेवढे एकच काम आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे या खात्याच्या अधिकाऱ्यांनासुद्ध खाद्य पदार्थांमधील या भेसळीचा निश्चितच सामना करावा लागत असणार आहे. असे असताना हे खाते ही भेसळ रोखण्यासाठी नेमके करते तरी काय, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

मेलॅचिट ग्रीनमुळे कॅन्सरला निमंत्रण

धोकादायक बाब म्हणजे भाज्या हिरव्या दिसण्यासाठी हे जे काही मेलॅचिट ग्रीन नावाचे केमिकल आहे, ते आहारात आल्यास कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. ही भेसळ ओळखण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अशा भाजीवर पांढरा कपडा फिरविल्यास कपड्याला हिरवा रंग लागतो किंवा अशा भाज्या काही काळ पाण्यात बुडवून ठेवल्यास पाणी किंचित हिरव्या रंगाचे होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT