पुढारी ऑनलाईन : भारतामध्ये प्रथम मंकीपॉक्स संक्रमित रूग्ण आढळला आहे. हा संक्रमित रूग्ण केरळ या राज्यातील असून, चार दिवसांपूर्वी तो यूएईतून भारतात आला असल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत या रूग्णाच्या संपर्कात ११ जण आले असून, त्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमधील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चार दिवसांपासून यूपीएमधून आलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणासाठी पाठवण्यात आली असता त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर या मंकीपॉक्सच्या रूग्णाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
संंक्रमित रूग्णाचे आई, वडील, टॅक्सी ड्रायव्हर, ऑटो ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटवरील 11 सहप्रवासी यांच्यासह संपर्कातील व्यक्तींची ओळख पटली आहे. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून, केरळ आरोग्य विभागाने मंकीपॉक्सवर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.