Latest

Fernando Santos : रोनाल्डोला कट्यावर बसवणा-या सँटोस यांचा राजीनामा! मोरिन्हो होणार पोर्तुगालचे नवे प्रशिक्षक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : फर्नांडो सँटोस (fernando santos) यांनी पोर्तुगालच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशने (FPF) याची माहिती दिली असून विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभव झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या जागी जोस मोरिन्हो (jose mourinho) हे प्रशिक्षक पदाची सुत्रे हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एफपीएफने एका निवेदनात म्हटलंय की, 'नवीन सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे फेडरेशन आणि सँटोस यांनी एकमेकांच्या सहमतीने करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2014 मध्ये सुरू झालेला सँटोस यांचा यशस्वी प्रवास राहिला आहे. त्यांनी संघाच्या जडणघडणीसाठी जे केले ते उत्तम होते. आता पुढील राष्ट्रीय प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.' (fernando santos)

दरम्यान, सँटोस (fernando santos) यांनीही प्रशिक्षक पदावरून पायउतार होताना एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या निरोपाच्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, पोर्तुगालला प्रशिक्षण देणे हे एक स्वप्न सत्यात उतरले असून माझ्या जीवनाचे ध्येय पूर्ण झाले आहे. नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संघा नवी उंची गाठेल. पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा!'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युरो 2024 साठी पात्रता फेरी मार्चमध्ये सुरू होईल. त्यापूर्वी फेडरेशनला मोरिन्हो (jose mourinho) यांना पोर्तुगालचे नवे प्रशिक्षक बनवायचे आहे. त्यांच्याशी लवकरच कराराच्या मुद्यावरून वाटाघाटी केल्या जातील. ज्याच्या आधारावर मोरिन्हो यांना पोर्तुगाल राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच त्यांना इटलीतील रोमा क्लबसाठीही काम करण्याची मुभा दिली जाणार आहे. दरम्यान, रोमाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या मोरिन्हो यांनी पोर्तुगालचे प्रशिक्षक होण्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपल्या रणनीतीमुळे वादात सापडले असले तरी फर्नांडो सँटोसचा कार्यकाळ चांगला होता. सँटोस यांनी 2014 मध्ये पोर्तुगालच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि 109 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. सांघिक विजेतेपद मिळवण्याव्यतिरिक्त, सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक विजय मिळवणारे प्रशिक्षक ठरले आहेत. सँटोस यांच्या प्रशिक्षणाखाली पोर्तुगालने 2016 मध्ये युरो कप आणि 2018-19 मध्ये युएफा नेशन्स लीग जिंकली. मात्र तर 2018 चा विश्वचषक आणि युरो 2020 स्पर्धेच्या राउंड ऑफ 16 फेरीतून संघाला बाहेर पडावे लागले.

पोर्तुगालमध्ये बदल घडवून आणण्यास मोरिन्हो सक्षम

59 वर्षीय मोरिन्हो यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षकपद भूषवलेले नाही परंतु युरोपमधील काही मोठ्या क्लबसाठी त्यांचे रेकॉर्ड प्रभावी आहे. ते दोन वेळा पोर्टो, चेल्सी, इंटर मिलान, रिअल माद्रिद आणि एकदा मँचेस्टर युनायटेडचे ​​व्यवस्थापक राहिले आहेत.

मोरिन्हो यांनी चेल्सीला तीन 'प्रीमियर लीग'चे विजेतेपद, इंटर मिलानला दोन 'सेरी ए क्रॉऊन' आणि रिअल माद्रिदला एक लीग जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. याचबरोबर मे महिन्यात झालेल्या युरोपा कॉन्फरन्स लीग स्पर्धेचे जेतेपद इटलीच्या रोमा क्लबला मिळवून दिले. हे मोरिन्हो यांचे पाचवे युरोपियन विजेतेपद ठरले. सध्याच्या सर्व UEFA स्पर्धा जिंकणारे ते पहिले प्रशिक्षक बनले आहेत. मॉरिन्हो यांचा रोमासोबतचा करार 2024 पर्यंत आहे. संघ सध्या सेरी ए मध्ये सातव्या स्थानावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT