मुंबई; पीटीआय : जुलैमध्ये होणार्या वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा करण्यात आली आहे. यशस्वी जैस्वालचा प्रथमच या संघात समावेश करण्यात आला आहे. जैस्वालला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौर्यावर दोन कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर यशस्वीच्या वडिलांची प्रतिक्रिया भावुक होती. यशस्वी जैस्वाल याने स्वतः सांगितले की, जेव्हा त्यांच्या वडिलांना हे समजले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. (Yashasvi Jaiswal)
पीटीआयशी बोलताना यशस्वी म्हणाला की, जेव्हा माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा ते रडू लागले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा आता भारतासाठी खेळणार याचा आनंद त्यांना झाला होता. माझ्या कष्टाचे चीज होत आहे, असे त्यांना वाटत होते. पण, मी अद्याप आईला भेटलो नाही. मी सकाळी सरावासाठी बाहेर पडलो होतो. काही वेळाने मी माझ्या आईला भेटेन. (Yashasvi Jaiswal)
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघातही यशस्वी राखीव खेळाडू म्हणून होता. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याची संघात निवड झाली आहे. यशस्वी म्हणाला, मला खूप आनंद झाला आहे आणि मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. माझे नाव संघात आहे की नाही हे कळेपर्यंत मी थोडा घाबरलो होतो.
यशस्वी म्हणाला की, खरे तर खूप काही शिकण्यासारखे आहे आणि मला आशा आहे की मी या क्षणाचा आनंद घेत राहीन. मी नेहमी स्वतःला प्रेरित करत असतो. मी माझ्या संघाला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देऊ शकतो, असा आत्मविश्वास नेहमीच मनाशी बाळगत असतो. खरे म्हणजे माझे वडील मला नेहमी सकारात्मक विचार करण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देतात. तो पुढे म्हणाला, माझी तयारी जोरात सुरू आहे आणि त्यासाठी मी सतत वरिष्ठ खेळाडूंचा सल्ला घेत आहे. मी त्याच्याकडून आतापर्यंत खूप काही शिकलो आहे.
हेही वाचा;