Latest

खासगी दूध संस्थांनी दुधाचे खरेदी दर कमी केल्याने शेतकरी आक्रमक

अमृता चौगुले
कार्‍हाटी : पुढारी वृत्तसेवा : खासगी दूध संस्थांनी पुन्हा दुधाचे खरेदी दर कमी करून   शेतकर्‍यांची निराशा केली आहे. आता मात्र शेतकरी या दूध संस्थांकडे दूध घालण्याऐवजी बाहेरील दूध संस्थेला बोलावून दूध विक्री करण्याच्या तयारीत आहेत.  शेतकरी यासाठी वाटेल त्या मार्गाने जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा शेतकरीवर्गात सुरू आहे. 16 ऑक्टोबरपासून प्रतिलिटर तीस रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्ये लिटर मागे चार ते पाच रुपये खासगी दूध संस्थांनी कमी केले आहेत. जुलैमध्येच राज्य शासनाने दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर 34 रुपयांवर निश्चित  केले होते.  शासनाच्या या आदेशाला दोन महिने उलटत नाही, तरच शेतकर्‍यांचा विरोध असताना खासगी संस्थांनी दुधाचे  दर कमी केले आहेत. शेतकर्‍याला या खासगी दूध संस्थांनी  तयार केलेले पशुखाद्य घ्यावयाचा आग्रह करायचा आणि मनाला वाटेल तसे दुधाचे दर कमी करायचे हे असले आता चालणार नाही, अशा शब्दांत ठणकावत शेतकरी आता संघटित होण्याच्या दृष्टीने चर्चा करीत आहेत.
खासगी दूध संस्थांनी दुधाचे खरेदी दर कमी केल्याने शेतकरी आक्रमक
बारामती तालुक्यामध्ये दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर 40 रुपये करण्यासाठी शेतकरी उपोषण करीत आहेत.  या उपोषणाला साथ देण्याचे सोडून दुधाचे बाजारभाव पाडण्याचे काम सध्या मुद्दाम  या भागाचे नेते म्हणविणारे करीत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा या भागात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. शेतात पिके नाहीत, चारा कुठून आणायचा, जिवापाड सांभाळलेले  पशुधन जगवायचे कसे, या विचारात शेतकरी पडला असताना दुधाला वाढीव दर मिळण्याऐवजी दुधाचे दर कमी करण्यात आले आहेत. याचा फटका सर्वांत जास्त शेतकरीवर्गाला बसत आहे. एकीकडे पाण्याच्या बाटलीची तुलना दुधाच्या लिटरबरोबर करीत  असणारे नेते आता मूक गिळून गप्प का? असा संतप्त प्रश्न कार्‍हाटीचे  शेतकरी  अरविंद साळुंके, मधुकर वाबळे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना विचारला.
हेही वाचा : 
SCROLL FOR NEXT