पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्ली-उत्तरप्रदेशच्या सीमेवर आंदोलन करणा-या शेतक-यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिकांना हमीभाव, बेरोजगारी आदी मागण्यांसाठी आज शेतकरी पुन्हा आंदोलन करत आहेत. प्रथम दिल्लीच्या जंतरमंतर येथे शेतकरी आंदोलन करणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी शेतक-यांना जंतरमंतर वर आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही. तसेच शेतकरी दिल्लीत जंतरमंतरवर पोहोचणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी पोलिसांनी चोहीकडे कडक सुरक्षा केली आहे. तर गाझीपूर सीमेवर आंदोलन करणा-या शेतक-यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिकांना किमान हमीभाव (एमएसपी) आणि इतर मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुन्हा दिल्लीकडे कूच केले आहे. शेतकर्यांनी सोमवारी जंतरमंतर येथे निदर्शने करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात केली. दिल्लीत येत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवरच रोखले. टिकैत काही समर्थकांसह दिल्लीत येणार होते; पण पोलिसांनी त्यांना दिल्लीत जाण्यास मनाई केली. त्यानंतर टिकैत हे समर्थकांसह तिथेच बसून आंदोलन करू लागले.
त्यानंतर पोलिस त्यांना मधुविहार पोलिस कार्यालयात घेऊन गेले. शेतकर्यांनी त्यांच्या विविध मुद्द्यांवरील उपायांसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन टिकैत यांनी शुक्रवारी देशभरातील शेतकर्यांना केले होते. राष्ट्रव्यापी आंदोलन कधी, कुठे, कसे होईल याची माहिती योग्य वेळी देऊ, असे ते म्हणाले होते. दरम्यान, दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यासह सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवली गेली आहे. या आंदोलनासाठी शेतकरी येण्यास सुरुवात झाली आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी सांगितले होते की, केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा 'टेनी' यांना मंत्रिपदावरून हटविण्यासह किमान हमीभाव देण्यासाठी कायदा करावा. तसेच इतर मागण्यांसाठी लखीमपूर खिरी येथे सुरू असलेले धरणे आंदोलन जिल्हाधिकार्यांशी चर्चेनंतर मागे घेतले आहे. दि. 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील बैठकीत संयुक्त किसान मोर्चाची भविष्यातील रणनीती ठरेल.