नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा पिकांना किमान हमीभाव (एमएसपी) आणि इतर मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुन्हा दिल्लीकडे कूच केले आहे. शेतकर्यांनी सोमवारी जंतरमंतर येथे निदर्शने करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर बॅरिकेडिंग करण्यास सुरुवात केली. दिल्लीत येत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवरच रोखले. टिकैत काही समर्थकांसह दिल्लीत येणार होते; पण पोलिसांनी त्यांना दिल्लीत जाण्यास मनाई केली. त्यानंतर टिकैत हे समर्थकांसह तिथेच बसून आंदोलन करू लागले.
त्यानंतर पोलिस त्यांना मधुविहार पोलिस कार्यालयात घेऊन गेले. शेतकर्यांनी त्यांच्या विविध मुद्द्यांवरील उपायांसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन टिकैत यांनी शुक्रवारी देशभरातील शेतकर्यांना केले होते. राष्ट्रव्यापी आंदोलन कधी, कुठे, कसे होईल याची माहिती योग्य वेळी देऊ, असे ते म्हणाले होते. दरम्यान, दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर सिमेंटचे बॅरिकेड लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यासह सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवली गेली आहे. या आंदोलनासाठी शेतकरी येण्यास सुरुवात झाली आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी शनिवारी सांगितले होते की, केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा 'टेनी' यांना मंत्रिपदावरून हटविण्यासह किमान हमीभाव देण्यासाठी कायदा करावा. तसेच इतर मागण्यांसाठी लखीमपूर खिरी येथे सुरू असलेले धरणे आंदोलन जिल्हाधिकार्यांशी चर्चेनंतर मागे घेतले आहे. दि. 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील बैठकीत संयुक्त किसान मोर्चाची भविष्यातील रणनीती ठरेल.