Latest

Fans Troll Gautam Gambhir : सूर्यासाठी ट्विट करणं गौतम गंभीरला पडलं महागात! कारण….

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Fans Troll Gautam Gambhir : श्रीलंकेविरुद्ध तिस-या टी-20 सामन्यात शतक फटकावणा-या सूर्यकुमार यादवसाठी ट्विट करणा-या गौतम गंभीरवर चाहते भडकले आहेत. गंभीरले दिलेली प्रतिक्रिया चाहत्यांना आवडलेली नसून त्यामुळे माजी क्रिकेटपटू चांगला ट्रोल होत आहे.

राजकोटमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात श्रीलंकेविरुद्धच्या विजयात टीम इंडियाच्या स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने महत्त्वपूर्ण योगदान दिले. सूर्याने 51 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावांची खेळी साकारत आपल्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. या खेळीच्या जोरावर भारताला 228 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्याची ही खेळी पाहून सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले. यात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने ट्विट करून सर्वांचे लक्षवेधून घेतले. पण त्याच्या या प्रतिक्रियेवर चाहते संतापले. सूर्याला कसोटी संघात संधी मिळावी असे मत गंभीरने आपल्या ट्विटमध्ये मांडले. (Fans Troll Gautam Gambhir)

गंभीर ट्विटमध्ये म्हणाला की, 'शानदार खेळी… सूर्यकुमार यादव! त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळवण्याची वेळ आली आहे!' त्याच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेटप्रेमी संतप्त झाले. खरे तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या आधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कसोटी संघात संधी का द्यायची? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. काही चाहत्यांनी सरफराज खानचे उदाहरण दिले आहे. सरफराज हा गेल्या काही काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे, तरीही त्याला अद्याप कसोटी संघात स्थान मिळालेले नाही, असे चाहत्यांचे मत आहे.

एका चाहत्याने ट्विट केलंय की, 'गौतम तुझ्याकडून चांगली अपेक्षा होती. तो संघ का बनवतो? रणजी क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्यांचे काय. उदाहरण सरफराज? पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मच्या आधारे पूर्णपणे वेगळे असणा-या टेस्ट क्रिकेटसाठी एखाद्या खेळाडूची निवड झाली, तर ते योग्य ठरणार का? असा सवाल केला आहे.

त्याचवेळी एका चाहत्याने म्हटलंय की, 'कशाच्या आधारावर? टी-20 मध्ये चांगले खेळणे हा कसोटी संघातील निवडीचा निकष आहे? मग सरफराजसारखे लोक रणजीमध्ये का मेहनत घेत आहेत? सर्व खेळाडू सर्वच फॉरमॅटमध्ये असण्याची गरज नाही. सूर्याला टी-20 स्पेशालिस्ट होऊ द्या,' अशी फिरकी घेतली.

दुसऱ्या एक चाहता म्हणतो की, 'तुम्ही सरफराज आणि इतर रणजी खेळाडूंबद्दल का बोलत नाही. तुमच्याकडे आधीपासूनच विहारी आहे. कृपया आम्हाला तो कसोटीत नको आणि वनडेतही नको.'

SCROLL FOR NEXT