Latest

Union Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राहुल शेवाळे, भावना गवळी, प्रफुल्ल पटेल यांची नावे आघाडीवर

अविनाश सुतार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार (Union Cabinet Expansion) होणार असून शिवसेना नेते राहुल शेवाळे, भावना गवळी तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती शनिवारी (दि.८) सूत्रांनी दिली.
पुढील वर्षीच्या मध्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार (Union Cabinet Expansion) म्हणून आगामी मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाकडे पाहिले जात आहे. गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडले होते. त्यानंतर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे अटळ मानले जात आहे. त्यादृष्टीने खा. राहुल शेवाळे आणि खा. भावना गवळी यांची नावे आघाडीवर आहेत.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारबरोबर हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्या गटाच्या प्रफुल्ल पटेल यांची देखील मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून किमान दोन मंत्रीपदे निश्चित आहेत, मात्र तसे करीत असताना दोन मंत्रीपदे जाण्याचीही शक्यता आहे. चालूवर्षीच्या अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळातील वरील राज्यांचे प्रतिनिधित्व वाढविले जाणार असल्याचे समजते.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT