Latest

औरंगाबाद : ऐनवेळी सेंटर बदलले, एका बेंचवर तीन विद्यार्थी, पदवी परीक्षेचे ढासळले नियोजन

स्वालिया न. शिकलगार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर व त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या १ जूनपासून पदवीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. दोन वर्षात प्रथमच ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत असल्याने परीक्षा विभागाचे नियोजन ढासळल्याचे आज (दि. २) दिसून आले. अनेकांना ऐनवेळी सेंटर बदलून दिल्याने विद्यार्थ्यांचा वेळही गेला आणि सेंटर गाठताना झालेली धावपळ यातून मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी १५ ते २० मिनिटे वेळेआधीच पेपर घेतल्याची तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.

मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून बीएससीच्या बायोटेक, तसेच कॉम्प्युटर सायन्स, बीसीसीचा पेपर होता. शहरातील विजेयंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात ४०० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. त्या ठिकाणी ऐनवेळी ७०० विद्यार्थी पाठवल्याने एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी अचानक वाढल्याने बैठक व्यवस्था विस्कळीत झाली. या विद्यार्थ्यांची व्यवस्था करताना महाविद्यालयाच्या प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसून परीक्षा द्यावी लागली. त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्यानेही विद्यार्थी हैराण झाले होते.

वेळे आधीच पेपर घेतला

सिडको एन-३ येथील छत्रपती महाविद्यालयात बीसीसीच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा पेपर नियमित वेळेच्या १५ ते २० मिनिटे आगोदर घेतल्याने विद्यार्थ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. या बाबत परीक्षा मंडळाचे प्रमुख गणेश मंझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वेळ वाढवून दिला

दरम्यान ऐनवेळी सेंटर बदलल्याने विद्यार्थ्यांचा सेंटर शोधण्यात जो वेळ गेला, तेवढा वेळ वाढवून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT