Latest

अकरावीचा प्रवेश अर्ज आजपासून भरता येणार

अमृता चौगुले

पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची संधी सोमवारपासून (दि.30) मिळणार आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना याद्वारे अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन, मात्र विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भरता येणार आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. उर्वरित राज्यात प्रवेश प्रचलित पद्धतीने प्रवेश होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव व्हावा, यासाठी 23 ते 27 मे दरम्यान 'मॉक डेमो रजिस्ट्रेशन'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा, अर्ज भरताना काय माहिती आवश्यक आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या सरावामुळे आली.

आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आणि लॉगिन करून अर्ज भरावा लागणार आहे. तसेच, अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहे. त्याशिवाय लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करता येतील. ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे, अशा सुविधादेखील दिल्या जाणार आहेत.

माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शक केंद्रांनी विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज भाग एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे, उच्च माध्यमिक शाळा नोंदणी व दुरुस्ती करणे, याची सुविधादेखील सोमवारपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये प्रवेशासाठी आपल्या पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सुरू होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने पूर्वीच स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT