Latest

पुणे : वणव्यात होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू; पानशेत धरणखोऱ्यातील दुर्घटना

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

रायगड जिल्ह्यालगत असलेल्या पानशेत धरण खोऱ्यातील अतिदुर्गम पोळे येथील रानात सरपण आणण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा अचानक लागलेल्या भीषण वणव्यात होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तुकाराम भाऊ निवंगुणे (वय ६५, रा. पोळे, ता. वेल्हे) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. ३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. स्थानिक कार्यकर्ते अनंता पोळेकर व ग्रामस्थांनी तुकाराम यांना उपचारासाठी वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास, डॉ. डी. बी. भोईटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भीषण आगीत तुकाराम यांच्या शरिराचा अक्षरशः कोळसा झाल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या प्रकरणी वेल्हे पोलीस अधिक तपास करत आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनेचे गांभीर्य पाहून सखोल चौकशी सुरू केली आहे.

आरोग्य सेवा, दळवळण ठप्प

केंद्र व राज्य सरकार नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुर्गम भागात मदतकार्य पोहचावे यासाठी प्रशासनाला वांरवार आदेश देत आहेत. असे असले तरी पानशेत धरण भागातील रायगड जिल्ह्यालगतच्या दुर्गम भागातील वाड्या ,वस्त्या, गावात बारमाही पक्के रस्ते नाहीत. आरोग्य सेवाही नाही. अशी गंभीर परिस्थिती आहे. पोळे येथील दुर्घटनाग्रस्त तुकाराम निवंगुणे यांना त्यामुळे पानशेत येथे न आणता दुर अंतरावरील वेल्हे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागले. खराब रस्त्यावरून प्रवास करताना रुग्णवाहिका चालकाला मोठी कसरत करावी लागली. आजच्या घटनेमुळे प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT