Latest

शिवसेनेचा गटनेता ‘मीच’!, उद्धव ठाकरेंच्या आदेशाला एकनाथ शिंदेंकडून केराची टोपली

रणजित गायकवाड

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेने बंडखोर आमदारांना आज संध्याकाळच्या बैठकीला हजर राहा नाहीतर कारवाईला तयार रहा, असे आदेश दिल्यानंतर शिंदे गटाकडून महाडचे आमदार भरत गोगावले यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद हे भरत गोगावले असल्यामुळे मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी काढलेल्या आदेश अवैध आहेत, ते शिवसेना आमदारांना लागू नाहीत, असा पवित्रा शिंदे गटाने घेतला आहे.

शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण हा आता तांत्रिक मुद्दा तयार झाला आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ३५ पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे संख्याबळ एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने आहे. 'वर्षा'वर होणार्‍या शिवसेना आमदारांच्या बैठकीला शिंदे गटाचे आमदार उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे या आमदारांवर काय कारवाई करता येईल याबाबत शिवसेनेत विचार मंथन सुरू आहे. त्यापूर्वीच एकनाथ शिंदे गटाने सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवले आहे.

अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवडही अवैध

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची केलेली नियुक्ती ही देखील अवैध असल्याचे पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. त्यावर शिवसेनेच्या ३४ लोकांच्या सह्या आहेत. शिवसेनेचा गटनेता आपणच असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेनेचा व्हीप सुद्धा बेकायदेशीर असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT