विधानसभा बरखास्त करणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंची स्पष्टोक्ती | पुढारी

विधानसभा बरखास्त करणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंची स्पष्टोक्ती

मुंबई: पुढारी वृत्तसेवा; राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली असून या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपविली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांना घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यामूळे उद्धव ठाकरे हे मंत्रीमंडळ बैठकीत राजीनामा देतील असा तर्क लावला जात होता. मात्र, या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या माध्यमातून सरकारचे कामकाज चालू असून लगेच राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात प्रत्यक्ष उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीचा तसेच सरकारवर आलेल्या संकटाबाबत कोणतीही चर्चा केली नाही. मंत्रिमंडळासमोर असलेल्या नियमित अकरा विषयावर निर्णय घेऊन ही बैठक संपली.

विधानसभा बरखास्त करणार नाही : मुख्यमंत्री

राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना सांगितले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यातील राजकीय घडामोडींचा पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत यापुढे ही एकत्र काम करेल, विधानसभा बरखास्त करणार नाही, असे ठाकरे यांनी कमलनाथ यांना सांगितले.

दरम्यान, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय ठाकरेंचा असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीवरुन एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Back to top button