Latest

IPL money laundering case | आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल जयसिंघानी याला अटक केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी आहे. त्याला आता अहमदाबादमधील ईडी युनिटने अटक केली आहे. १० हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याला मध्य प्रदेश पोलिसांच्या कोठडीतून ताब्यात घेत अटक केली आहे.

बुकी असलेला जयसिंघानी हा मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो १५ हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी आहे आणि सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीवेळा अटक झाली आहे. दरम्यान, त्याने नुकत्याच झालेल्या अटकेला आव्हान दिले होते. पण अनिल जयसिंघानीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

अनिल जयसिंघानी हा मूळचा ठाण्यातील उल्हासनगरचा रहिवाशी आहे. देशातील सर्वात मोठ्या सट्टेबाजांमध्ये अनिल जयसिंघानीचे नाव घेतले जात होते. २०१० मध्ये ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बेट घेताना पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली तेव्हा तो चर्चेत आला होता. नंतर या क्षेत्रात आणि मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातही त्याचे वजन वाढत राहिले.

'ईडी'च्या गुजरात युनिटने २०२५ च्या सुरुवातीला त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केल्यानंतर तो देश सोडून गेला होता. अनिल जयसिंघानी विरोधात महाराष्ट्र, आसाम, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये सट्टेबाजीशी संबंधित १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
अनिल जयसिंघानी याचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो ट्विट करून भाजप नेते मोहीत कंबोज यांनी या दोघांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुषमा अंधारे यांनीही एकनाथ शिंदेंनीच अनिल जयसिंघानीला 'मातोश्री'वर आणले, उल्लेखनीय म्हणजे श्रीकांत शिंदेंचे कार्यालय हे जयसिंघानीच्याच जाग्यावर असल्याचा गंभीर आरोपही केला होता.

अनिल जयसिंघानीचा सर्व राजकीय पक्षांत वावर राहिला. २०१० मध्ये अनिल जयसिंघानी याच्याविरोधात सट्टेबाजीचे अनेक गुन्हे दाखल असतानाही पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर पोलिसांनी जयसिंघानीचे संरक्षण काढून घेतले होते.

२०१५ च्या क्रिकेट विश्वचषकापूर्वीही बुकी असलेल्या अनिल जयसिंघानीला पुन्हा पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. विरोधकांनी ही बाब लक्षात आणून देताच फडणवीसांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्याचे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. नंतर गुजरात 'ईडी'ने जयसिंघानी विरोधात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केल्यानंतर तो फरार झाला होता.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT