सट्टेबाज जयसिंघानी राजकारणातही वजनदार

सट्टेबाज जयसिंघानी राजकारणातही वजनदार

Published on

मुंबई ः वृत्तसंस्था गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अनिल जयसिंघानी हा सहआरोपी आहे. त्याची मुलगी अनिक्षा मुख्य आरोपी असून पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. हा अनिल जयसिंघानी कोण? त्याचे राजकीय लागेबांधे काय आहेत ते येथे समजून घेऊया…

अनिल जयसिंघानी हा मूळचा ठाण्यातील उल्हासनगरचा रहिवाशी. देशातील सर्वात मोठ्या सट्टेबाजांमध्ये अनिल जयसिंघानीचे नाव घेतले जात होते. 2010 मध्ये ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बेट घेताना पोलिसांनी त्याला पहिल्यांदा अटक केली तेव्हा तो चर्चेत आला. नंतर या क्षेत्रात आणि मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातही त्याचे वजन वाढत राहिले.

'ईडी'च्या गुजरात युनिटने 2015 च्या सुरुवातीला त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केल्यानंतर तो देश सोडून गेला. अनिल जयसिंघानी विरोधात महाराष्ट्र, आसाम, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये सट्टेबाजीशी संबंधित 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
अनिल जयसिंघानी याचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो ट्विट करून भाजप नेते मोहीत कंबोज यांनी या दोघांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनीही एकनाथ शिंदेंनीच अनिल जयसिंघानीला 'मातोश्री'वर आणले, उल्लेखनीय म्हणजे श्रीकांत शिंदेंचे कार्यालय हे जयसिंघानीच्याच जाग्यावर असल्याचा गंभीर आरोपही केला.

अनिल जयसिंघानीचा सर्व राजकीय पक्षांत वावर राहिला. 2010 मध्ये अनिल जयसिंघानी याच्याविरोधात सट्टेबाजीचे अनेक गुन्हे दाखल असतानाही पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. त्यानंतर पोलिसांनी जयसिंघानीचे संरक्षण काढून घेतले.

2015 च्या क्रिकेट विश्वचषकापूर्वीही बुकी असलेल्या अनिल जयसिंघानीला पुन्हा पोलिस संरक्षण देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. विरोधकांनी ही बाब लक्षात आणून देताच फडणवीसांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्याचे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले. नंतर गुजरात 'ईडी'ने जयसिंघानी विरोधात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केल्यानंतर तो फरार झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news