Latest

Hasan Mushrif : राजकीय आकसातून ईडीची कारवाई : हसन मुश्रीफ

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईडीच्या अधिकाऱ्यांचा काहीही दोष नाही, त्यांना वरून आदेश आला की ते छापेमारी करत आहेत. त्यामुळे ईडी आणि आयकर विभाग कोण चालवत आहे? हे तुम्हीच ओळखा. सत्ता येऊनही राजकीय आकसातून कारवाई केली जात आहे. विशिष्ट धर्माच्या नेत्यांना टार्गेट करत आहात का? असा सवाल माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उपस्थित केला. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील निवासस्थानावर ईडीने आज (दि. ११) छापेमारी केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खुलासा केला.

गडहिंग्लजमधील साखर कारखान्यांशी माझा कोणताही संबंध नाही. हा कारखाना आता ब्रिस्क कंपनी चालवत नाही. या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. कागलमधील संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांच्या पैशातून उभारला आहे. चार वर्षापूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. तरी आता टाकलेल्या ईडीच्या छाप्याचे कारण माहीत नाही. परंतु, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ  (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

मुश्रीफ पुढे म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नव्याने तेच आरोप केले आहेत. त्यांचे आरोप खोटे असून त्यांच्या आरोपांना यापूर्वी तीन पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे. त्यांच्यावर दीड कोटीचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे. पुणे येथील चंद्रकांत गायकवाड यांच्याशीही माझे काहीही कनेक्शन नाही. यापूर्वीच्या छापेमारीतून काहीही निष्पन्न झालेले नाही. मग कशाच्या आधारावर छापे घातले जात आहेत, हे समजत नाही.

आज सकाळपासून घरावर, नातेवाईक आणि मुलीच्या घरांवर छापे घातल्याचे समजत आहे. मी काही कामानिमित्ताने बाहेर आहे. मला दूरध्वनीवरुन ही बातमी मिळालेली आहे. कारखाना, घर आणि नातेवाईकांची घरे यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, त्यांनी कागल बंदची घोषणा केली आहे. ती त्यांनी मागे घ्याव. त्यांनी शांतता ठेवावी. ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांची कारवाई करण्यास सहकार्य करावे. या आधीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. केंद्रीय यंत्रणानी माहिती घेतली होती. मात्र, आता पुन्हा त्यांनी ही छापेमारी का केली हे मला काहीही माहिती नाही. 30 ते 35 वर्षांचे माझे सार्वजनिक जीवन लोकांच्या समोर आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कारवाई केल्यानंतर काहीही सापडलेले नाही.

Hasan Mushrif : भाजप नेत्याचा या मागे हात

चार दिवसांपूर्वी भाजपचे कागलमधील एक नेते दिल्लीत अनेकवेळा चकरा मारुन माझ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते की, चारच दिवसात मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई होईल, असे सांगितले होते. हे मी जबाबदारीने सांगत आहे. त्यानंतर ही कारवाई होताना दिसत आहे. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

आधी नवाब मलिक झालेत. आता माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणत आहेत. त्यामुळे विशिष्ट जातीच्या लोकांच्या लोकांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी शंका निर्माण होत आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT