कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सेवा 2021 परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला असून, जिल्ह्यातील विश्वजित जालंधर गाताडे (रा. म्हाळुंगे, ता. करवीर), ऐश्वर्या जयसिंग नाईक-डुबल, (रा. हळदी, ता. करवीर, सध्या रा. कराड), अपर्णा जयसिंग यादव (रा. निगवे दुमाला, ता. करवीर), सीमा शांतिनाथ गवळी (रा. वसगडे), निशिगंधा राजाराम रसाळ (रा. फुलेवाडी) यांनी यश मिळविले.
विश्वजित गाताडे यांची 2020 च्या राज्य सेवा परीक्षेतून सहायक विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली होती. नव्याने त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. ऐश्वर्या नाईक यांची राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकपदावर निवड झाली होती. नव्याने त्यांची नगरपालिका मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे. तसेच अपर्णा यादव यांची राज्य सेवा 2020 च्या परीक्षेतून नायब तहसीलदार म्हणून निवड झाली होती. नव्याने त्यांची जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गट 'अ'पदी निवड झाली आहे. सीमा गवळी यांची सहायक गटविकास अधिकारीपदी निवड झाली आहे. निशिगंधा रसाळ यांची सहायक कामगार आयुक्तपदी निवड झाली आहे.