Latest

E-Raktakosh : एका क्लिकवर समजणार राज्याचा रक्तसाठा

मोहन कारंडे

सातारा : विशाल गुजर : राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना आता रक्त संकलनाची माहिती 'ई-रक्तकोष' या पोर्टलवर भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांच्या नोंदणी सुविधेसोबतच, पोर्टलमध्ये रक्तपेढ्यांमधील शिल्लक रक्त, त्यांचे रक्तगट, येणारे नवीन रक्त, रुग्णांना दिलेले रक्त याचा सर्व डाटा ऑनलाईन एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे तातडीने रक्त आवश्यक असलेल्या रुग्णांना तेवढ्याच तत्परतेने रक्त मिळणार असून अनेक रुग्णांचे जीव वाचणार आहेत.

… तर एनओसी रद्द

राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्त संकलनाची माहिती अद्ययावत करून ती ई- रक्तकोष या संकेतस्थळावर रोज अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या रक्तपेढ्या रोजची अपडेट माहिती भरणार नाहीत त्यांच्यावर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून दिले जाणारे 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय प्रतिदिन एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

साताऱ्यातील ११ पेढ्या

ई-रक्तकोष पोर्टलवर जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय मिळून ११ रक्तपेढ्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यासमोरील उपलब्ध साठा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील माहिती दर्शवली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या पेढ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

रुग्णांची गैरसोय टळणार

रुग्णांना रक्ताची ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी त्यांना तातडीने रक्त उपलब्ध होत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार रक्ताची मात्रा वापरली जाते. त्यातही रुग्णाचा रक्तगट कोणता आहे, त्यावरही रुग्णाला कोणत्या रक्तगटाची गरज आहे, हे ठरवले जाते. त्यामुळे ते रक्त उपलब्ध होण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. रुग्णांची गैरसोय दूर करून त्यांना जवळच्या रक्तपेढीची, रक्ताची उपलब्धता याची माहिती तत्काळ व्हावी यासाठी शासनाने ई- रक्तकोष हा उपक्रम हाती घेतला आहे.

काय आहे ई-रक्तकोष पोर्टल?…

ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील रक्त केंद्र आणि रक्ताची उपलब्धता याची माहिती देणारे हे व्यासपीठ आहे. विशेष म्हणजे देशभरातील रक्ताच्या उपलब्धतेची माहितीही पोर्टलवर मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT