Latest

ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तावरे यांची अखेर गच्छंती

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करी प्रकरण ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना अखेर भोवले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्याकडे तब्बल आठ वर्षांपासून असलेला रुग्णालयाच्या अधीक्षकपदाचाही पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे.
विभागीय प्रत्यारोपण समितीचे अधिकारही चौकशी पूर्ण होईपर्यंत काढून घेण्यात आले आहेत.

डॉ. तावरे ससून रुग्णालयाचे अधीक्षक व विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करीप्रकरणी आरोग्य विभागाने सुरुवातीला रूबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना निलंबित केला. त्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) ही चौकशी समिती नियुक्त करत दुसरी मोठी कारवाई केली. सध्या अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे, तर डॉ. तावरे त्यांच्या मूळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असतील.

'डीएमईआर'चे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी बुधवारी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. तावरे यांना अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार तावरे यांनी गुरुवारी सकाळीच पदभार सोडला; तसेच नवीन अधीक्षक नियुक्त करण्याचे अधिकारही डीएमईआरने स्वतःकडे राखीव ठेवले आहेत. ससूनच्या अधिष्ठातांना नवीन अधीक्षक पदासाठी पात्र असलेल्यांची नावे पाठवा, असे सांगण्यात आले असून, विभागाकडूनच नवीन अधीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.

रुग्णालय परीसरात चर्चेला उधाण

याआधी कित्येक वेळा तक्रारी होऊनदेखील डॉ. तावरे सलग सात ते आठ वर्षे अधीक्षकपद त्यांच्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, किडनी प्रकरण त्यांना चांगलेच भोवले आहे. कार्यभार काढल्यानंतर ससून रुग्णालयात गुरुवारी दिवसभर याबाबतच दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र, या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. पदभार काढण्याचे कारण मात्र माहीत नाही. सध्या या पदाचा कार्यभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे.

– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT