Latest

Dr Abhay Bang : मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा – डॉ. अभय बंग

सोनाली जाधव

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख कोटींची दारू फस्त केली जाते. महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूमुळे भारतीय स्त्री वैधव्याची इच्छा करत आहे. मात्र, राजकारण आणि निवडणुका दारुवर विसंबून असल्याने मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा केला जात आहे, आरोप गडचिरोली येथील शोधग्रामचे पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केला.  (Dr Abhay Bang) दारूमुळे कित्येक वर्ष समाजहित धोक्यात आले. मात्र दारू संदर्भात कडक शिक्षा कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचेही  त्‍यांनी सांगितले.

Dr Abhay Bang : दारूमुळे समाजहित धोक्यात

वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी परिसरात सुरु असलेल्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात आज प्रकट मुलाखतीत ते आपल्या भावना व्यक्त करत होते. आचार्य विनोबा भावे सभामंडपात पार पडलेलली ही मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत यांनी घेतली.

या वेळी सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यावर विशेष असा प्रकाश मराठी साहित्यिकांकडून टाकण्यात आलेला नाही, असा खेद बोलून दाखवला. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले. हा इतका मोठा रंजक काळ ललित आणि बुद्धीनिष्ठतेने आता तरी साकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्‍ट्रात ज्ञानोबा, तुकोबा, विनोबा हे सर्वकालिक महान साहित्यिक घडले. साहित्यिकांसाठी आळंदी, देहू आणि वर्धा हे साहित्य पंढरी व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संचालन प्रा. अभय दांडेकर यांनी केले. आभार रंजना दाते यांनी मानले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT