पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने चुकीचा आणि घातक पायंडा पाडला आहे. फुटलेल्या आमदारांवर कोणते आरोप आहेत ते पाहा. ईडीला फक्त विरोधकांचीच प्रकरणे दिसत आहेत का? अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तुमच्या पक्षात संत, साधू आणि महात्मेच आहेत का? रोज १०० प्रकरणे बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात जर मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची शंभर प्रकरणं टपाटपा खाली पडतील, अशी टीकाही राऊत यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून भाजपवर केली. आज (दि.२७) माध्यमांशी ते बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले की, राजकिय विरोधकांना पोलिस प्रकरणांमध्ये गुंतवून, त्यांना जामीन मिळू द्यायचा नाही, त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा, महाराष्ट्रात पोलिस यंत्रणांचा वापर करायचा, हे बेफामपणे सुरू आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणुका जवळ येतील तसे हे आणखी वाढत जाईल. मनिष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून जगाला हेवा वाटावं अस काम केलं आहे. सरकारी खात्याच्या एका धोरणात्मक निर्णयासंदर्भात त्यांना अटक केली, पण अशा प्रकारचे निर्णय कॅबिनेटचे असतात. छगन भूजबळ, अनिल देशमुख यांना अटक केली तेव्हाही त्यांचे निर्णय हे कॅबिनेटचे होते. खोट्या आरोपांसाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहेत. देशाच दुर्देव आहे की, देशातील लोकशाही नाहीशी होत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
तुमच्या पक्षात संत आणि महात्मेच आहेत का? रोज १०० प्रकरणे बाहेर येत आहेत. महाराष्ट्राच झाडं हलवलं तर भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं बाहेर पडतील. भाजपने चुकीचा आणि घातक पायंडा पाडला आहे. फुटलेल्या आमदारांवर कोणते आरोप आहेत ते पाहा. ईडीला फक्त विरोधकांची प्रकरणे दिसत आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गेलं म्हणून रडत न बसता पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करण्यासाठी काम करत आहे. जे सरकार आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकले नाही ते सरकार स्थिर आहे, हे कस म्हणता येईल. त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय हे आमच्यासाठी आशेचे किरण आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :