

पिंपरी : रविवारी सकाळच्या सत्रात बहुतेक मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दरम्यान दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडत उत्साह दाखवल्याने टक्केवारीत वाढ होत गेली. सर्व केंद्रांवर मतदार यादीतील क्रमांक शोधून देण्यासाठी मतदान केंद्राच्या ठरवून दिलेल्या सीमारेषेबाहेर बहुतेक ठिकाणी मंडप टाकले होते. कार्यकर्ते आलेल्या मतदारांना चिठ्ठीवर क्रमांक लिहून देत होते. वयोवृद्धांना गाडीतून केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यकर्त्यांची दिवसभर धडपड दिसून आली. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
चिंचवडगावातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदारांची तुरळक गर्दी होती. मतदान केंद्रांवर मतदार जनजागृतीची रांगोळी काढण्यात आली होती. दुपारनंतर बहुतेक सर्व केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. पिंपळे गुरव याठिकाणी मनपा शाळेत मतदानासाठी दुपारनंतर मोठी गर्दी झाली होती. तसेच काळेवाडी येथे देखील मतदारांच्या दुचाकी व चारचाकीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
मतदान केंद्रांच्या नाम साधर्म्यांमुळे मतदारांचा गोंधळ
चिंचवडगावात मनपाच्या तलावाजवळची क्रांतीवीर चापेकर शाळा व चापेकर चौकातील हुतात्मा चापेकर शाळा ही दोन मतदान केंद्रे होती. चापेकर नावाचे साधर्म्य असल्याने बहुतांश मतदारांचा गोंधळ उडाला. त्यामुळे मतदान केंद्रावरील कार्यकर्त्यांंना मतदारांना केंद्रांविषयी मार्गदर्शन करताना नाकीनऊ आले.