पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी अंक बोलू लागले तर… हे ऐकून आश्चर्य वाटेल…पण, हे खरंय… या वर्षीही पुण्यातील काही प्रकाशन संस्थांनी चक्क ऑडिओ स्वरूपातील दिवाळी अंकांची निर्मिती केली असून, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्याला यू-ट्यूब चॅनेलवर दिवाळी अंकातील लेख, कथा, कविता ऐकायला मिळतील… तेही विनामूल्य… छापील अंक वाचण्यासाठी वेळ नसणार्यांना अंकांतील लेख ऐकता येत आहेत. काळाप्रमाणे बदलत संस्थांनी चक्क बोलणारे अंक काढले आहेत आणि नामवंत लेखक, कलाकार आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्टने या अंकांमध्ये लेखांचे अभिवाचन केले आहे.
संबंधित बातम्या :
दिवाळी म्हटल्यावर छापील दिवाळी अंक वाचण्याला प्राधान्य दिले जाते. छापील अंकांची परंपरा आपल्याकडे रुढ झालेली आहे. पण, आता प्रकाशकही नवे प्रयोग करत आहेत आणि संस्थांनी नव्या माध्यमाकडे झेप घेतली आहे. वाचकांसाठी ऑडिओ स्वरूपात अंक आणले आहेत. विविध लेखकांनी लिहिलेले लेख, कथा, कविता ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करण्यात आले असून, कलाकार आणि व्हाईस ओव्हर आर्टिस्टने त्यासाठी अभिवाचन केले आहे. या बोलणार्या अंकांना पसंतीही मिळत आहे.
पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे म्हणाले, नवीन प्रयोग करावा याचा विचार करत होतो. त्यामुळे 'शब्द आभा' या ऑडिओ अंकाची संकल्पना पुढे आली आणि कामाला सुरुवात झाली. या अंकात कथा आणि विविध विषयांवरील लेख आहेत, ते ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून त्याची लिंक तयार करून यू-ट्यूब चॅनेलवर ते ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. अरुणा ढेरे, चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, गजानन परांजपे आदींनी अंकासाठी अभिवाचन केले आहे. या अंकाचे सात भाग असून, रोज एक भाग विनामूल्य ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिला जात आहे.
'चपराक' प्रकाशनचे घनश्याम पाटील म्हणाले, 'साहित्य चपराक' आणि 'लाडोबा' हे अंक आम्ही ऑडिओ स्वरूपातही विनामूल्य उपलब्ध केले आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर यू-ट्युब चॅनेलवर हे अंक विनामूल्य ऐकायला मिळतील. छापील अंक आपण नेहमीच पाहतो, त्यामुळे ऑडिओ बुक स्वरूपातील अंक करावे वाटले. मागील वर्षीही आम्ही हा प्रयोग केला होता. आताही ऑडिओ स्वरूपातील अंक आणले आहेत. तेही विनामूल्य आहे. ऑडिओ अंकासाठी 80 अभिवाचकांनी आवाज दिला आहे.