Latest

Dhule Crime : कत्तलीसाठी बांधून ठेवली 50 गुरे, सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा; कत्तलीसाठी गुरांची तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने हाणून पाडला. पण या गुरांना जप्त करीत असताना संबंधित तस्करांनी तुफान दगडफेक केली. यात दोन पोलीस गाड्यांचे नुकसान झाले असून खाजगी आयशर गाडीचा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणात आता सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्या तस्करांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

शिरपूर तालुक्यातील पळासनेर भागात हेंद्रापाडा गावाच्या नजीक जंगलामध्ये कत्तलीसाठी अज्ञात तस्करांनी गुरे बांधून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली. यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत व अमरजीत मोरे तसेच हेमंत बोरसे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, राजीव गीते यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळी सुमारे 50 जनावरे बांधून ठेवल्याची बाब निदर्शनास आली. ही सर्व जनावरे एका नाल्याच्या पात्रामध्ये बांधून ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलीस पथकाने पंचनामाची कारवाई करून गुरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी खाजगी वाहनांना पाचरण केले. दरम्यान पोलीस अधीक्षक धिवरे हे धुळे शहराकडे रवाना झाले. गुरे जप्त करून ती सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कार्यवाही मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. पोलीस पथकाने खाजगी गाडीमध्ये गुरे भरण्यास सुरुवात करताच अंधारामधून तुफान दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीमुळे सांगवी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या जीपच्या काचेचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे खाजगी आयशर गाडीचा चालक देखील जखमी झाला. या प्रकारामुळे पोलीस पथकाने बचावात्मक पवित्रा घेत गुरांना हलवण्याचे काम केले.

दरम्यान रात्री उशिरा या संदर्भात सांगवी पोलीस ठाण्यात रिंजडा दुर्गा पावरा, राकेश रिंजडा पावरा, मुकेश रिंजडा पावरा, (राहणार बक्तरिया, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम हेंद्रापाडा), टेपा पावरा, राजेश पावरा व अन्य पाच ते सहा जणांच्या विरोधात भादवी कलम 353, 326, 332 ,143 ,147 ,148 ,149, 427 ,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच व नऊ सह मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1)( 3) चे उल्लंगन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दगडफेक करणारे आरोपी हे मध्य प्रदेशातील बकतरिया परिसरातील राहणारे असून त्यांना अटक करण्यासाठी आता पथके रवाना करण्यात आली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT