Latest

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'राज्यसभेच्या सहा जागा असून, त्यामधील सहाव्या जागेबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील,' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

राज्यसभेच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर मंगळवारी आमची एक बैठक दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होत असून, या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. विभागीय आयुक्तालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजित कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, की काँग्रेसकडेही काही जादा मते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांची 7 ते 8 मते जास्त आहेत, तर शिवसेनेकडे 18 ते 20 मते जास्त आहेत. मागील राज्यसभा निवडणुकीवेळी महिलेस राज्यसभेवर पाठविण्याबाबत शरद पवार यांच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील तोच निर्णय सहाव्या जागेबाबत होईल. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार ठरवतील तो निर्णय अंतिम असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाना पटोले काही जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका भाजपला मदत करणारी असल्याच्या वक्तव्यावर म्हणाले की, हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. तो आम्ही एकत्रित बसून सोडवू.

राज्यातील वीज वापर घटला…

राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने मध्यंतरी 25 हजार मेगावॅटपर्यंत विजेचा प्रतिदिवस वापर होत होता. तो वातावरण बदलामुळे आता 2 हजार मेगावॅटने कमी झालेला आहे. ही मागणी येत्या काही दिवसांत आणखी कमी होईल. सद्य:स्थितीत भारनियमन केले जात नाही. सोलर पंपास अग्रक्रम देण्यास प्राधान्य देण्यात आले.

SCROLL FOR NEXT