Latest

ऑस्‍ट्रेलियाच्‍या डेव्‍हिड वॉर्नरने दिले निवृत्तीचे संकेत : म्‍हणाला, “माझे क्रिकेटमधील…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाचा दिग्‍गज क्रिकेटपटू डेव्‍हिड वॉर्नर याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. " २०२३ हे वर्ष माझ्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे वर्ष असू शकते", असे त्‍याने म्‍हटलं आहे. मात्र एकीकडे निवृत्तीचे संकेत देत असतानाच २०२४ मधील टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेचे आयोजन अमेरिका किंवा वेस्‍ट इंडिजमध्‍ये व्‍हावे, अशी अपेक्षाही त्‍याने व्‍यक्‍त केली आहे. ( David Warner hints at retirement )

David Warner hints at retirement : माझ्‍या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष असेल

यासंदर्भात 'स्‍काय स्पोर्ट्स'शी बोलताना डेव्‍हिड वॉर्नर याने निवृत्तीचे संकेत दिले. तो म्‍हणाला की, "सध्‍या मी २०२४ च्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे. ही स्‍पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्‍ये व्‍हावी, अशी माझी इच्‍छा आहे. येथे ऑस्‍ट्रेलियाला विजय मिळवून देणे माझे स्‍वप्‍न आहे; पण बहुधा २०२३ हे माझ्‍या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष असेल."

१३ वर्षांच्‍या कारकीर्दीत वॉर्नरने केल्‍या आहेत अनेक अविस्‍मरणीय खेळी

गेली १३ वर्ष वॉर्नर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये खेळत आहे. आतापर्यंत १०१ कसोटी सामन्यांमध्ये त्‍याने ४६.२९ च्या सरासरीने ८ हजार १३२ धावा केल्‍या आहेत. कसोटीमध्‍ये त्‍याने २५ शतके आणि ३४ अर्धशतके फटकावली आहेत. कसोटीमध्‍ये ३३५ धावांची खेळी ही त्‍याची  वैयक्तिक सर्वोत्‍तम आहे. वॉर्नर याने १४१ वनडे सामने खेळले आहेत. यामध्‍ये त्‍याने ४५.१६ सरासरीने ६,००७ धावा केल्‍या आहेत. वनडे सामन्‍यात १७९ ही त्‍याची सर्वोत्‍कृष्‍ट खेळी ठरली असून, या फॉर्मेटमध्‍ये त्‍याने १९ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत.

टी-20 फॉर्मेटमध्‍ये वॉर्नरने ९९ सामन्‍यांमध्‍ये ३२.८८च्‍या सरासरीने २ हजार ८९४ धावा केल्‍या आहेत. टी-२०मध्‍ये त्‍याच्‍या नावावर एक शतक आणि २४ अर्धशतके आहेत. या फॉर्मेटमध्‍ये १०० धावांची सर्वोत्‍कृष्‍ट खेळीही त्‍याच्‍या नावावर आहे. वॉर्नर हा २०१५ मधील वनडे विश्‍वचषक स्‍पर्धा आणि २०२१ मधील T20 विश्वचषक स्‍पर्धेच्‍या ऑस्‍ट्रेलिया संघात सहभागी होता. या दोन्‍ही स्‍पर्धांमध्‍ये त्‍याने संघासाठी बहुमूल्‍य योगदान दिले होते.

९ फेब्रुवारीपासून भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्‍पर्धा होणार आहे. या स्‍पर्धेसाठी वॉर्नर ऑस्‍ट्रेलिया संघात सहभागी होणार आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ९ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होईल. या दौऱ्यात चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. ९ फेब्रुवारीपासून नागपूरच्या व्हीसीए मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT