Latest

CSK vs MI : चेन्नईने जिंकली मुंबई!

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा तब्बल 7 गडी राखून फडशा पाडला आणि एकवेळ ब्लॉकबस्टर होऊ शकणार्‍या या लढतीवर एककलमी वर्चस्व गाजवण्यात अजिबात कसर सोडली नाही. मुंबईला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 157 धावांवर रोखल्यानंतर चेन्नईने 18.1 षटकांत 3 बाद 159 धावांसह सहज विजय संपादन केला.

विजयासाठी 158 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना डेव्हॉन कॉनव्हे शून्यावर बाद झाल्याने चेन्नईचीदेखील खराब सुरुवात झाली होती; पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड (36 चेंडूंत नाबाद 40), अजिंक्य रहाणे (27 चेंडूंत 61), शिवम दुबे (26 चेंडूंत 28), अम्बाती रायुडू (16 चेंडूंत नाबाद 20) यांनी संघाला विजयाकडे सहज आगेकूच करून दिली.

केवळ 158 धावांचे संरक्षण करण्यासाठी मुंबईला केवळ चमत्कार होण्याचीच अपेक्षा होती. तीही फोल ठरली. मुंबईतर्फे बेहरेन डॉर्फ, पीयूष चावला व कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, ईशान किशन (31), टीम डेव्हिड (31), तिलक वर्मा (22) व रोहित शर्मा (21) यांच्या छोट्या खेळींच्या बळावर मुंबई इंडियन्सने 8 बाद 157 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईतर्फे रवींद्र जडेजाने (20 धावांत 3), तर तुषार देशपांडे, सँटनर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सिसांदा मगलाने 37 धावांत 1 बळी घेतला.

प्रारंभी, रोहित शर्माने 13 चेंडूंत जलद 21 धावा केल्या. मात्र, चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तुषार देशपांडेने त्याचा त्रिफळा उडवत मुंबईला पहिला धक्का दिला. किंचित वळलेल्या या चेंडूने बचाव भेदत बेल्स कशा उडवल्या, याचा रोहितला पत्तादेखील लागला नाही. फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने चौथ्याच चेंडूवर ईशान किशनला प्रिटोरियसकरवी झेलबाद केले.

धोनीने डीआरएस घेतल्यानंतर सूर्यकुमारला एका धावेवर बाद होत परतावे लागले. कॅमेरून ग्रीनचा जडेजाने परतीचा टिपलेला झेल, हे या सामन्याचे ठळक वैशिष्ट्य ठरावे. वास्तविक, ग्रीनचा सणसणीत फटका आपल्याला इजा करून जाऊ नये, यासाठीच कदाचित जडेजा चटकन रिफ्लेक्ट झाला होता. पण, या प्रयत्नात चेंडू अगदी अलगदपणे त्याच्या हातात विसावला आणि यानंतर ग्रीनला तंबूत परतणे भाग होते.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT