Latest

नगर : साई चरणी ३३ लाखाचा हिरेजडित सुवर्ण मुकुट

अमृता चौगुले

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा : साई भक्तीचा महिमा हा अजरामर आहे, साईबाबांची विलक्षण अनुभूती ही भाविकांना येत असते. त्याच अनुभूतीतून हैदराबाद येथील एका भाविकांने आपल्या स्वर्गीवासी पत्नीची इच्छापूर्ती करण्यासाठी साई चरणी सुमारे 33 लाख रुपये किमतीचा तब्बल ७०७ ग्रॅम हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.

हैदराबाद येथील मंडा रामकृष्ण यांनी हा रत्नजडीत सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केला. साई संस्थानच्या वतीने हे दान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारले. साईबाबांना शुक्रवारी दान स्वरुपात मिळालेला हा मुकूट अतिशय आकर्षक आहे. मुकुटावर रत्नांचा साज चढवण्यात आला आहे, ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलं आहे. हा मुकूट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार आज माध्यान्ह आरतीदरम्यान मूर्तीवर चढवण्यात आला.

साईभक्त डॉ. रामकृष्ण यावेळी सांगतात की, सन 1992 मध्ये ते शिर्डीला साईबाबा दर्शनसाठी सपत्नीक आले होते. यावेळी आरतीदरम्यान मुकूट चढवत असल्याचं त्यांची पत्नी रत्नाम्मा यांनी पाहिले. तेव्हाच त्यांनी बाबांना असाच सोन्याचा मुकूट चढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परिस्थिती अभावी तेव्हा ते शक्य झालं नाही. दरम्यानच्या काळात रत्नाम्मा यांचं निधन झालं. मात्र पत्नीची शेवटची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी पैसे जमवण्यासाठी डॉ रामकृष्णा यांनी अमेरिकेत काम सुरु केलं. पैशाची पुर्तता करुन ते भारतात आले आणि हैदराबाद येथे बाबांसाठी सोन्याचा मुकूट तयार करुन घेतला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. रामकृष्णा म्हणाले, 'साईबाबांच्या इच्छेपुढे काहीच नसतं, आज वयाच्या 88 व्या वर्षी पत्नीची इच्छा पूर्ण करताना खूप आनंद होत आहे. तिनं मागितलेलं हे मागणं मी पूर्ण करत आहे. माझी दोन मुलं आणि दोन मुली यांच्यासोबत आज बाबांच्या दरबारात हे दान देत आहे'.

SCROLL FOR NEXT