Latest

महाराष्ट्राची जनता फसणार नाही; ‘इंडिया’च्या बैठकीवर शिंदे गटाची टीका

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्व देश भारताचं कौतुक करत असताना विरोधक मात्र टीका करत आहेत. विरोधकांना भारताचा अभिमान वाटत नाही का? असा सवाल शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना केला आहे. "युपीए भ्रष्टाचारी होती म्हणून भारताच्या जनतेने त्याला लाथाडलेलं होत. युतीच नाव 'इंडिया' ठेवून युपीएच्या काळात घडलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी नव्या चेहऱ्यांनी लोकांसमोर येण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्राची जनता फसणार नाही, अशी सडकून टीका केसरकर यांनी विरोधकांच्या आज (दि.३१) मुंबईत होत असलेल्या बैठकीवर केली आहे.

मुंबई येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, एकवेळ पक्ष विसर्जित करेन पण काँग्रेसबरोबर जाणार नाही. त्यांचे विचार पायदळी तुडवले असून त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गॅस, इंधनाचे दर कमी केले नाहीत. आम्ही सत्तेत आल्यानंतर इंधनाचे दर कमी केले. त्यामुळे गॅसच्या किंमती आम्हाला घाबरून कमी केल्या, हे हास्यास्पद विधान आहे. आमचा पक्ष बलवान झाला की अरूणाचलमधून चीन मागे हटेल, हे देखील हस्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जगभरातील लोक गुंतवणूकीसाठी भारताकडे बघत आहेत. भारताची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सूरू झाली आहे. सर्वसामान्य माणूस सुखी व्हायला लागला असताना विरोधकांना लोकशाही आठवली. लोकशाही असल्यानेच तुमची सरकारे काही राज्यात आली. युपीए वरून इंडिया का झालं? भारताच्या जनतेनं तुम्हाला कधीही स्वीकारलं नाही. भारताची संस्कृती तुम्हाला मान्य नाही. ३७० कलम हटवणे तुम्हाला मान्य नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसने भ्रष्टाचार केला आणि त्यामुळेच युपीए नाव बदनाम झालं. सध्या लोक तीच आहेत फक्त नावं बदललं आहे. त्यांनी जनतेसाठी आपआपल्या राज्यात काम करावं. भारताची प्रगती थांबली तरी चालेल पण मोदींसारखा सक्षम नेता नको, अशी भूमिका कोणी घेत असेल तर हे भारताला मान्य नाही. ज्या महाराष्ट्राचा स्वाभिमान बाळासाहेबांनी जागृत केला त्या बाळासाहेबांच्या मुंबईत सुरू असलेली लाचारी आम्हाला मान्य नाही. ही लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा  : 

SCROLL FOR NEXT