Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री; अटीतटीच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे नंबर 2 वर

Maharashtra CM
Maharashtra CM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, Maharashtra CM : राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रिपद गमावून उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेले देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राची मुख्यमंत्रिपदाची सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'महाराष्ट्राचा महापोल' या 'पुढारी' वृत्तसमूहाच्या सर्व्हेत सर्वात जास्त 25 टक्के जणांनी फडणवीस हे त्यांच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. त्यापाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 22 टक्के जणांनी पसंती दर्शवलीय, तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 टक्के मिळवून तिसर्‍या स्थानावर, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार 10 टक्के आणि सुप्रिया सुळे 6 टक्के असा महाराष्ट्राचा पसंतीक्रम आहे.

'पुढारी' वृत्तसमूहाच्या 'पुढारी न्यूज' या वृत्तवाहिनीच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी प्रसारित झालेल्या महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॉलिटिकल सर्व्हेने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. 60 हजारांहून अधिक सॅम्पल साईजच्या या सर्व्हेचा दुसरा टप्पा बुधवारी रात्री प्रदर्शित झाला. त्यात महाराष्ट्राचा एकूण राजकीय कौल संभ्रमात असल्याचे चित्र दिसून आले. (Maharashtra CM)

Maharashtra CM : आज निवडणुका झाल्यास 'एनडीए'कडे 48, 'इंडिया'कडे 43 टक्के कौल

आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, तर 'एनडीए'कडे 48 टक्के मतांची बेगमी आहे. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून 33 टक्क्यांवर आहे; तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 9 टक्के आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 6 टक्क्यांवर आहे. 'एनडीए' आणि 'इंडिया' आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. 'इंडिया'कडे 43 टक्के कौल आहे. त्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना प्रत्येकी 16 टक्के पसंती आहे; तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 11 टक्के जणांनी पाठिंबा दिलेला दिसतो. याचा अर्थ कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीलासुद्धा स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल.

विशेष म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादीतून फुटलेले नेते पुन्हा निवडून येणार नाहीत, असे 46 टक्के जणांना वाटते; तर राष्ट्रवादीची फूट ही लुटुपुटुची असल्याचे तब्बल 36 टक्के जणांना वाटते.

आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्यास 'एनडीए'ला 48 टक्के; तर 'इंडिया'ला
43 टक्के पसंती

अजित पवार यांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा आहे, असे महाराष्ट्रातल्या 36 टक्के जणांना वाटते

मुख्यमंत्रिपदाचा कौल देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने; पण मुंबई-कोकणाच्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news