पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७,०७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १४,४१३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख ७ हजार १८९ वर पोहोचली आहे. देशातील दैनंदिन कोरोनासंसर्ग दर ३.४० टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
याआधी बुधवारी दिवसभरात १८ हजार ८१९ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर, ३९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १३ हजार ८२७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५५ टक्क्यांवर पोहचला. तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.१६ टक्के आणि आठवड्याच्या कोरोनासंसर्गदर ३.७२ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९७ कोटी ७४ लाख ७१ हजार ४१ डोस देण्यात आले आहेत. यातील ११ लाख ६७ हजार डोस काल एका दिवसात देण्यात आले आहेत. आतापर्यंत ३.६६ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहे. खबदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ५७ लाख १७ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी ११ कोटी ५९ लाख ५२ हजार ४७५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात काल एका दिवसात ५ लाख २ हजार १५० तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ३,६४० नवे रुग्ण (COVID19) आढळून आले आहेत. तर ३ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ९२५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या राज्यात २४ हजार ९४० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत १,२६५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आणि एकाचा मृत्य झाला आहे.