इस्लामपूर; अशोक शिंदे इस्लामपूर : कोरोनाचा संकट काळ संपल्याचे भासत असले तरी प्रत्यक्षात अजूनही उच्च शिक्षणातही गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदा 'कोरोना बॅच'ची 'हॅट्ट्रिक' होण्याची शक्यता वाटत आहे. यंदाच्या पदवी-पदव्युत्तरच्या सर्व परीक्षा पुन्हा एकदा एमसीक्यू (मल्टिपल चॉईस क्वेश्चन; बहुपर्यायी परीक्षा) पद्धतीच्या होणार असल्याने प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांना बरा वाटणारा हा निर्णय महत्त्वाच्या टप्प्यावर शिक्षणाची गुणवत्ता हरवणारा ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.
मार्च 2020 च्या सुमारास अनेक ठिकाणी परीक्षा 'एमसीक्यू' म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाच्या सुरू झाल्या.कोरोनाचा संकट काळ हळूहळू पुढे वाढत गेल्यावर 2021 लाही बहुतांशी परीक्षा वर्णनात्मक ऐवजी एमसीक्यूने झाल्या. उच्च शिक्षणामध्ये सन 2021- 22 या सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिले सत्र काहीसे कोरोना सावटा खालीच होते. पहिले सत्र संपताना हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडेच कमी झाला आणि दुसरे सत्र ऑफलाईन पद्धतीच्या अध्यापनाने सुरळीत सुरू झाले. वर्गातील आवश्यक अशा शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर असण्याच्या शिक्षण पद्धतीला पूर्ववत स्वरूप आले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातही पदवी प्रथम वर्षाच्या ऑफलाईन परीक्षा महाविद्यालयांमधून वर्णनात्मक म्हणजे पूर्वीच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे झाल्या.
या परीक्षा या आठवड्यामध्ये संपतात न संपताच तोच विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्यांमुळे लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने आणि राज्य सरकारच्या या विभागाच्या निर्देशाप्रमाणे तसेच इतर विद्यापीठातील याच स्वरूपाच्या काही निर्णयांचा परिणाम विद्यापीठाच्या कक्षेतही दि. 29 जून रोजी पदवी, पदव्युत्तरस्तरावरच्या परीक्षा या एमसीक्यू पद्धतीने होणार असल्याचे पत्र निघाले.
एका बाजूला विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाला शिथिलता, परीक्षेतील मार्क वाढीला वाव, परीक्षेच्या टेन्शनपासून मुक्तता, असा काहीसा आभास दिसत असला तरी पुन्हा कधीही तपशीलवार अभ्यासाला येणार नाहीत असे विषय अभ्यासण्याला विद्यार्थी वर्ग दुरावणार आहे. अर्थात हा विषय अभ्यासाविषयी आत्मीयता असणार्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी महत्त्वाचा आहे. सवंग लोकप्रियता आणि बहुसंख्येने एमसीक्यूसाठी आग्रही असणार्या विद्यार्थी वर्गाचा रोष नको म्हणून घेतले गेलेले या स्वरूपाचे निर्णय म्हणजे गेल्या दोन वर्षात पदवी घेऊन बाहेर पडणार्या बॅचमध्ये यंदा तिसर्या वर्षाची भर पडणार आहे. आता बाहेर पडणारी तीन वर्षानंतरची ही बॅच म्हणजे संपूर्ण कोरोनाचा इफेक्ट झालेली बॅच म्हणून पुढे येणार आहे.
वरवरच्या व तुटपुंजा अभ्यासाने प्रत्येक विषयाची व त्याअंतर्गत असणार्या विविध धड्यांची संकल्पनादेखील विद्यार्थ्यांना मिळत नाही. स्टॅटॅस्टिक्स, सायन्स, मॅथेमॅटिक्स, अकाउंटन्सी यासारख्या विषयांचा तपशीलवार अभ्यास तर नव्या परीक्षा पद्धतीने टाळला जात आहे, टाळला गेला आहे. अर्थात या एमसीक्यू परीक्षा व त्या अंतर्गत होणारे गैरप्रकारदेखील चिंतेचा विषय बसून राहिला आहे.