पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधील वुहान प्रयोगशाळेत अपघातातून झाली असावी, असा दावा अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने केला आहे. दरम्यान, कोरोना महामारीला सुरुवात झाली तेव्हाही विविध देशांनी या महामारीला चीन जबाबदार असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने आपल्या नव्या अहवालात याचा पुन्नरुच्चार केला आहे.
मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनाने जगभर थैमान घातले. आजही त्याचे परिणाम आपण सहन करत आहोत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक देशांनी लस तयार करण्यात यश मिळवले. याच काळात जगभरातील विविध तपास यंत्रणांनी कोरोनाच्या उत्पत्तीसाठी चीनला जबाबदार असल्याचे म्हटले होते.
अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोरोना विषाणू उत्पत्तीबाबत नवा खुलासा केला आहे. ऊर्जा विभागाने वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित अहवालात म्हटले आहे की, बहुधा कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधील प्रयोगशाळेतून झाली आहे. ऊर्जा विभागाचा अहवाल वर्गीकृत गुप्तचर अहवालांद्वारे अधिसूचित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नुकताच तो व्हाईट हाऊस आणि काँग्रेसच्या प्रमुख सदस्यांनाही सादर करण्यात आला होता.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणूची उत्पत्ती नेमकी कुठे झाली या बद्दल अनिश्चिता होती. कोविड-19 विषाणूची निर्मिती ही चीनमधील वुहान प्रयोगशाळेत अपघातातून झाली असावी. 'एफबीआय'ने असेही निष्कर्ष काढले आहेत की, २०२१ मध्ये चीनमधील प्रयोगशाळेतील गळतीमुळे कोरोना व्हायरस साथीचा रोगाचा प्रसार झाला.
२०१९ च्या उत्तरार्धात चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणू बाधित पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून चीनला त्याच्या उत्पत्तीबद्दल संशयाने पाहिले जाते आहे. मात्र, चीनने प्रत्येक वेळी हे आरोप फेटाळून लावले आहेत. चीनचे म्हणणे आहे की, हा विषाणू बाहेरून आला आहे किंवा प्राण्यांपासून मानवांमध्ये आला आहे.
हेही वाचा