नगर : खासदारांपेक्षा आमदारच लयभारी; कोरोनामुळे खासदारनिधीला चाप | पुढारी

नगर : खासदारांपेक्षा आमदारच लयभारी; कोरोनामुळे खासदारनिधीला चाप

नगर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रादुर्भावामुळे खासदार निधीला फटका बसला. 2020-21 या आर्थिक वर्षातील 5 कोटींचा निधी उपलब्धच झाला नाही. त्यानंतरच्या आर्थिक वर्षांत फक्त 2 कोटींवर बोळवण झाली आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपत संपण्याच्या मार्गावर असताना खासदार निधीसाठी एक खडकू देखील केंद्र सरकाकडून उपलब्ध झाला नाही. त्यामुळे अहमदनगर व शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघातील स्थानिकस्तरावरील कामे रखडली आहेत. मात्र, आमदार निधी वेळेवर उपलब्ध होत असल्याने गावागावांत विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे आमदारच लयभारी असे म्हणत गावपुढारी आमदारांभोवती पिंगा घालताना दिसत आहेत.

प्रत्येक खासदारांना स्थानिक विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 5 कोटींचा विकास निधी उपलब्ध होत आहे. राज्य सरकारकडून आमदारांना देखील आमदार निधी उपलब्ध केला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून आमदार निधीत वाढ होत आहे. गेल्या आर्थिक वर्षांत आमदारांना चार कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. यंदाच्या 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी चार कोटींचा निधी प्रत्येक आमदारांच्या नावे उपलब्ध झाला.

मतदारसंघातील प्रत्येक गावात थोडेफार विकासकामे होत असल्यामुळे आमदार मंडळी खुष आहेत. प्रत्येक खासदारांना दरवर्षी 5 कोटींचा निधी उपलब्ध होतो. 17 व्या लोकसभेची निवडणूक मे 2019 रोजी झाली. पहिल्या वर्षांत अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.

कोरोना उपाययोजनामुळे दुसर्‍या वर्षासाठीचा खासदार निधी वितरित न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यानंतर 2021-22 या आर्थिक वर्षात फक्त 2 कोटींचा निधी उपलब्ध झाला. दोन कोटींचाच निधी असल्यामुळे कोणकोणत्या गावांत विकासकामे करावीत असा प्रश्न खासदारांना भेडसावला.

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी अद्याप खासदार निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील 10 कोटींची स्थानिक विकासकामे रखडली आहेत. निधी उपलब्ध झाल्यास गावागावांत काही विकासकामे करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे पाटील यांना खासदार निधीची प्रतीक्षा लागली आहे.

गावागावांत आमदार निधीतून कामे
आमदार अंतर्गत रस्ते, सभामंडप, डिजिटल शाळा, बोअरवेल, पाणीटाकी बांधकाम, पाईपलाईन, रुग्णवाहिका, ग्रंथालयांसाठी पुस्तके खरेदी आदी सार्वजनिक विकासकामांसाठी खासदार निधी उपयोगी पडतो. आमदार निधीतूनही स्थानिक पातळीवरील विकासकामे केली जात आहेत. मतदारसंघ लहान आणि निधी 5 कोटींचा. त्यामुळे गावपुढार्‍यांनी आमदार निधीतून गावात विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

Back to top button