पुढारी ऑनलाईन: चीन-अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान भारतातही कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेत, पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२२) उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गासंबंधित आज (दि.२२) दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. पीएम नरेंद्र मोदींच्या बैठकीत बूस्टर डोस वाढवण्यावर आणि मास्क घालण्यासारखे निर्बंध पुन्हा लागू करण्यावर विचार होऊ शकतो, असे बोलले जात आहे. तथापि, लॉकडाऊन किंवा बाजारपेठा बंद करणे इत्यादी निर्बंध येण्याची शक्यता नाही. परंतु जनसमुहीकरण कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाऊ शकतात.
ज्या चिनी BF.7 व्हेरियंटमुळे चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला. तो सप्टेंबरमध्येच भारतात आला होता. सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यात कोरोना खूप वेगाने फैलावतो. असे आतापर्यंतचे संशोधन आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 4 रुग्ण आढळले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज आपापल्या राज्यातील अधिकाऱ्यांसोबत कोरोना प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.