गेली दीड वर्षांहून अधिक काळ कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. (Controlling the corona ) कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना यश येत असल्याचे चित्र आहे. अनेक देशांमध्ये झालेल्या लसीकरणाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. काही देशांमध्ये मागील २४ तासांमध्ये कोरोनाचा नवा एकही रुग्ण आढळलेला नाही
कोरोना महामारीत जगभरात आतापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून काही देशांमध्ये कोरोना संसर्ग कमी होताना दिसत आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग दर खूपच कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे.
भारतातही कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील २५९ दिवसांमध्ये देशात सर्वात कमी नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासांत देशात १० हजार ४२३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात १ लाख ५३ हजार ७७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ही आकडेवारी मागील २५० दिवसांमधील सर्वात कमी आहे. देशात युद्धपातळीवर होत असलेल्या लसीकरणाचा सकारात्मक परिणाम आता दिसत आहे.
मागील २४ तासांमध्ये एकही नवा रुग्ण न सापडलेल्या देशांची यादी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. यामध्ये कॅनडा, अर्जेंटीना, स्पेन, बांगलादेश, बेल्जियम, कोस्टारिका, श्रीलंका, इक्वाडोर, म्यानमार, होंडुरास, घाना, अल साल्वाडोर, कॅमरुन, मालदीव, लक्जमबर्ग यांचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, स्विल्झर्लंडमध्ये मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे केवळ तीनच नवे रुग्ण आढळले आहे. ओमान आणि जाम्बिया या देशांमध्ये अनुक्रमे ८ व ५ नवीन रुग्ण आढळले आहेत.
मोजाम्बिक, कोसोवो, सेनेगल, मलावी, इस्वातिनी बुरुंडी आणि मेडागास्कर या देशांमध्ये १० पेक्षा कमी नवे रुग्ण आढळले आहेत. सर्व नागरिकांचे लसीकरण आणि प्र.तिबंधित उपायांच्या अंमलबजावणीमुळे काेराेना संसर्गावर मात करण्यात काही देशांना यश असल्याचे दिसत आहे.