Latest

pradnya satav: विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

backup backup

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. प्रज्ञा राजीव सातव (pradnya satav) यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने मरगळ आलेल्या काँग्रेसला उभारी मिळण्याची आशा वाढली आहे. प्रज्ञा सातव यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात काँग्रेसचे हात बळकट होण्यास मदत होण्याबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा कमबॅक करेल, असा अंदाज राजकीय तज्ञांनी व्यक्‍त केला आहे. (डाॅ. प्रज्ञा सातव)

हिंगोली जिल्हा नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे राहिला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्‍ला असलेल्या हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहिले. परंतू, मध्यंतरी काँग्रेसची वाताहात झाली. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

त्यानंतर स्व. राजीव सातव यांना राज्यसभेवर संधी देत जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न पक्षाने केला होता. मात्र राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसचे पक्षसंघटन नेतृत्वाअभावी खिळखिळे झाले. जिल्ह्यात काँग्रेसची नेते मंडळी असली तरीही कोणी खासदार, आमदार अथवा महामंडळावरही नसल्याने पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडेच प्रत्येक कामासाठी जाण्याची वेळ आली होती.

मात्र आता डॉ. प्रज्ञा सातव (pradnya satav) यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी हक्‍काचे नेतृत्व उपलब्ध झाले आहे. काँग्रेसची होत असलेली बिकट अवस्था, गटतट यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डॉ. प्रज्ञा सातव यांचा मोठा आधार मिळणार आहे.

पक्ष नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वर्षाताई गायकवाड, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्‍वासाने ही जबाबदारी टाकली. येणार्‍या काळात ती सार्थ ठरविण्यासाठी काम करणार आहे. काँग्रेसची विचारधारा सामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटन बळकट करण्याचा प्रयत्न राहिल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी दिली.

काँग्रेस पक्षाने सातव कुटूंबियांचे डॉ. प्रज्ञा सातव (pradnya satav) यांना विधान परिषदेवर संधी देऊन पुनर्वसन करीत दिलेला शब्द पाळला असला तरी आगामी काळात डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासमोर पक्षसंघटन वाढीचे आव्हान राहणार आहे.

स्व. राजीव सातव यांचे होमपिच म्हणून ओळख असलेल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. आमदार संतोष बांगर यांच्या रूपाने सेनेचे संघटन कळमनुरी विधानसभा मतदार संघात मजबुत होत आहे.

सध्या महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असल्याने हिंगोलीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय असला तरी तिनही पक्षांना आपल्या पक्षाचे संघटन वाढविण्याची संधी आहे. यातून भविष्यात संघर्ष होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

डॉ. प्रज्ञा सातव (pradnya satav) यांना पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच इतर पक्षातील विरोधकांवरही मात करून काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची सांगड बांधावी लागणार आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT