अकोला : पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसापूर्वीच आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आम्हीतर लग्नाला तयार आहोत. पण त्यांच्याकडून होकार आलेला नाही. आमच्यासोबत येण्याविषयी त्यांनी धोरण स्पष्ट केलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले चांगले संबंध होते. तसेच उद्धव ठाकरे हेही मित्र आहेत. त्यामुळे भविष्यात युती झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर एसटी कर्मचा-यांकडून अनुचित घटना घडू शकते, याची पूर्व कल्पना घटनेच्या चार दिवस आधी म्हणजे ४ एप्रिलरोजी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांना अपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी पत्राद्वारे दिली होती. असे असूनही पोलिसांनी काहीही केले नाही. याप्रकरणात प्रथमदर्शनी विश्वास नांगरे -पाटील दोषी दिसतात. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत नांगरे यांना निलंबित करा, अशी मागणीही आंबेडकरांनी यावेळी केली.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून जनतेवर भारनियमन लादले जात आहे. परंतु त्याचवेळी काही राज्यात अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. राष्ट्रीय ग्रीडमुळे काही सेकंदाच अतिरिक्त वीज उपलब्ध होऊ शकते. परंतु महाविकास आघाडी सरकारकडे कुठलेच नियोजन नाही. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांना विविध स्रोतातून किती वीज उपलब्ध आहे, याची माहिती देखील नाही. त्यामुळे राज्याला अंधारात लोटणाऱ्या आघाडी शासनाने सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला आहे, त्यामुळे सरकारला अधिकार नाही, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.
केंद्राच्या विद्युत अहवालानुसार गुजरात राज्यात 15738 मेगावॅट, तामिळनाडुत 8573 मेगावॅट, आंध्रप्रदेशात 8573 मेगावॅट, उत्तर प्रदेशात 10,523 मेगावॅट, अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. या राज्यांना विनंती केली, तर वीज महाराष्ट्राला मिळू शकते. तसेच निर्माण झालेला प्रश्न सुटू शकतो. महाराष्ट्रात सध्या 3540 मेगावॅट विजेची तूट आहे. नॅशनल ग्रीडमुळे ही समस्या तातडीने सुटू शकते. परंतु तसा प्रयत्न होत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे आंबेडकर म्हणाले. सध्या विविध प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात मुबलक पाणी आहे. या पाण्याचा उपयोग हायड्रो इलेक्ट्रिसीटी निर्माणासाठी होऊ शकतो. त्याद्वारे हायड्रो इलेक्ट्रिक जनरेशन वाढू शकते. परंतु त्याबाबत देखील आघाडी शासन गंभीर नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
हेही वाचलंत का ?