नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. सुमारे अडीच तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. समन्सची पडताळणी आणि हजेरी पत्रकावरील स्वाक्षरी यासारख्या काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास सोनिया गांधी यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे अडीच तासानंतर त्या ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. ईडीने सोनिया गांधी यांची आजची चौकशी पूर्ण केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कारणास्तव सोनिया गांधी यांना त्यांच्या विनंतीवरून जाण्याची परवानगी देण्यात आली.
दरम्यान, सोनिया गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने दिल्लीसह देशभरात निदर्शने केली. सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे ७५ खासदार आणि अनेक कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. पी. चिदंबरम, अजय माकन, मणिकम टागोर, केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, सचिन पायलट, हरीश रावत, अशोक गेहलोत, के सुरेश आणि इतरांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांना आज पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) समन्स बजावले होते. त्यानुसार त्या आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या. मागील काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्या ईडी चौकशीला सामोरे गेल्या नव्हत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस चौकशीसाठी हजर राहावे, असे ईडीने त्यावेळी म्हटले होते. त्यानुसार आज त्यांची नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिग प्रकरणी चौकशी झाली. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने सलग पाच दिवस चौकशी केली होती.
दरम्यान, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या उभय सदनात उमटले. लोकसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन गदारोळ केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'सोनिया गांधी महामानव नाहीत' असा टोला मारला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. दरम्यान, सोनिया यांच्या ईडी चौकशीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन करुन सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात आल्याच्या मुद्यावरुन कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारकडून बदला घेण्याचे राजकारण सुरु असून अशा कारवायांना घाबरणार नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळावर बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले की, कायद्यासमोर सर्वजण सारखे आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा महामानव आहेत का? कॉंग्रेसवाल्यांना वाटते की आम्ही कायद्याच्या वर आहोत. मात्र कायदा आपले काम करेल, असा निर्वाळा आपण सरकारच्या वतीने देतो. जोशी यांच्या उत्तरानंतर गदारोळ झाला आणि अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज तहकूब करावे लागले.
दरम्यान कॉंग्रेससहित द्रमुक, माकप, भाकप, आययुएमएल, नॅशनल कॉन्फरन्स, टीआरएस, एमडीएमके, व्हीसीके, शिवसेना, राजद, आरएसपी आदी पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करीत सरकारच्या कारवाईला विरोध केला आहे. केंद्रातले मोदी सरकार विरोधी नेत्यांचा बदला घेत असून तपास संस्थांना सर्रास गैरवापर केला जात आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारच्या विरोधातील लढाई आणखी तीव्र केली जाईल. नेत्यांच्या उत्पीडनाची आम्ही निंदा करीत असून या सरकारने सामाजिक सौदाहार्य बिघडवण्याचे काम थांबवावे, असे निवेदनात म्हटले आहे.