Latest

बालदिन विशेष : त्यांच्या सहृदयतेने उजळले चिमुकल्यांचे आयुष्य

अंजली राऊत

नाशिक : अंजली राऊत
शहरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीने आई सोडून गेलेल्या चिमुकल्याला दत्तक घेत त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तर संघर्षशील विचारांचा वारसा असलेल्या एका अविवाहित युवतीने एका चिमुरडीला दत्तक घेत तिला मायेची छाया दिली आहे. या दोन्ही कहाण्यांतून सहृदयतेचा प्रत्यय येत असून, या दोन्ही चिमुरड्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. आजच्या बालदिनानिमित्त या दोन्ही कहाण्या प्रेरक ठराव्यात. यातील पहिली कहाणी आहे, चहा आणि भाजीविक्रेत्या तृतीयपंथीय संजना महाले यांची, तर दुसरी कहाणी आहे शासकीय कर्मचारी असलेल्या मालती गायकवाड यांची…

मातेने सोडलेल्या बाळाला मायेची ऊब

नाशिकरोड उड्डाणपूल येथे गेल्या वीस वर्षांपासून चहाची टपरी आणि भाजीविक्री करून उदरनिर्वाह करणार्‍या संजना महाले या तृतीयपंथीयाकडे एक अनाथ मुलगी रोज पोटापाण्यासाठी पैसे मागत असत. कालांतराने ती मुलगी संजना यांनाच आई म्हणून हाक मारू लागली. संजना यांनी याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंदही केली. मात्र, संजना यांनाच आई म्हणून मानल्याने त्या मुलीचे संगोपन करण्याचे त्यांनी ठरविले. तिचे संगोपन करून संजना यांनी तिचा विवाहदेखील लावून दिला. मात्र, दुर्दैवाने त्या मुलीचा भातुकलीचा संसार अर्ध्यावरच राहिला आणि ती एका मुलाला जन्म देऊन बेपत्ता झाली. नवजात अर्भकाला सोबत घेऊन पुन्हा हिंमतीने उभे राहून संजना यांनी त्या बाळाचा सांभाळ सुरू केला. गौरव संजना महाले म्हणून त्याला शाळेत देखील दाखल करण्यात आले असून, त्याचा खाण्यापिण्यापासून सर्व शैक्षणिक खर्च त्या करत आहेत. संजना या नाशिक येथील बी. डी. भालेकर या शाळेतून नववी उत्तीर्ण असून, सामाजिक कामात देखील सक्रिय आहेत. त्या महापालिका शाळा तसेच रेल्वेस्थानक येथील अनाथ मुलांना स्वहस्ते खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात.

तीन मातांचे छत्र मिळालेली 'हृदया'

शासकीय नोकरीत कार्यरत असणार्‍या मालती गायकवाड या पाच भाऊ व दोन बहिणींसह आई वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या असल्या तरी महाविद्यालय स्तरापासून स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षण व विपश्यना शिबिरानंतर त्यांनी बालक दत्तक घेण्याचा निश्चय केला. त्यानंतर सन 2012 पासून दत्तक बाळ घेण्याच्या निश्चयावर ठाम राहत त्यांनी कारा संस्थेद्वारे दि.17 डिसेंबर 2021 मध्ये एका चिमुरडीला दत्तक घेतले. अवघे 4 महिने 24 दिवसांच्या मुलीला दत्तक घेताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांच्यासोबत त्यांच्या मामेबहिणी रूपाली आणि मनीषा यासुद्धा या बाळाचे पालनपोषण करीत आहेत. अगदी मनापासून अर्थात, 'हृदया'पासून दत्तक म्हणून स्वीकारण्यात आलेल्या या बाळाचे नावही त्यांनी 'ह्दया' ठेवले आहे.

स्त्रियांनी शील जपून सकारात्मक विचारांच्या शक्तीवर महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर निश्चयावर ठाम राहिले पाहिजे. त्यात पारदर्शकता असेल तर मग कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. बाळाला दत्तक घेण्यासाठी हजारो अडचणींना सामोरे जावे लागले, परंतु मागे न हटता निश्चयावर ठाम राहिल्याने माझी इच्छा पूर्ण झाली आहे. जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन बाळाला घडवायचे आहे. तिला दत्तक घेतल्यानंतर तिच्या पायगुणामुळे लगेचच मला बढती मिळाली आहे. आता मी माझे बाळ 'ह्दया' सोबत खूप आनंदात आहे.                                                                                    – मालती गायकवाड, एकल माता पालक.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT