पुढारी ऑनलाईन डेस्क
रशिया- युक्रेनमधील संघर्षादरम्यान रशियाचे अब्जाधीश रोमन अब्रामोविच (Roman Abramovich) यांनी त्यांचा चेल्सी फुटबॉल क्लब (Chelsea club) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी जाहीर केले आहे की ते हा क्लब विकणार आहेत. रोमन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जवळचे मानले जातात. पण ५५ वर्षीय अब्रामोविच यांनी पुतीन यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
त्यांनी आता क्लब (Chelsea club) विकण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. त्यांची टीम एक चॅरिटेबल फाउंडेशन सुरु करणार आहे. या माध्यमातून युक्रेनच्या युद्ध पीडित लोकांची मदत केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.
क्लबच्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात उद्योजक अब्रामोविच यांनी म्हटले आहे की कठीण निर्णय घेतला आहे ज्यामुळे मला दुःख होत आहेत. क्लब विक्रीतून मिळालेली रक्कम युद्ध पीडितांना दान केली जाईल. मी नेहमीच क्लबचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले आहेत. सध्याच्या परिस्थितीत, मी क्लब विकण्याचा निर्णय घेतला आहे, कारण मला विश्वास आहे की हे क्लब, चाहते, कर्मचारी तसेच क्लबचे प्रायोजक आणि भागीदार यांच्या हिताचे आहे.
क्लब विक्रीची प्रक्रिया जलदगतीने होणार नाही. पण त्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबली जाईल. मी कोणत्याही कर्जाची परतफेड करण्याची मागणी करणार नाही. हे माझ्यासाठी कधीही व्यवसाय किंवा पैशाशी संबंधित नव्हते, तर केवळ खेळ आणि क्लबच्या आवडीसाठी होते. शिवाय, मी माझ्या टीमला एक चॅरिटेबल फाउंडेशन स्थापन करण्याची सूचना दिली आहे जिथे विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम दान केली जाईल. ही रक्कम युक्रेनमधील युद्धातील सर्व पीडितांसाठी दिली जाईल. पीडितांच्या तातडीच्या आणि तात्काळ गरजांसाठी ती कामी येईल.
क्लबवर १.५ अब्ज पाउंड पेक्षा जास्त कर्ज असल्याने क्लब विक्रीसाठी काढला असल्याची अटकळ बांधली जात आहे. अब्जाधीश असलेले हंसजोर्ग वायस यांनी बुधवारी स्विस वृत्तपत्र ब्लिकशी बोलताना म्हटले होते की त्यांना क्लब विकत घेण्याची ऑफर मिळाली आहे.
रोमन यांनी २००३ मध्ये हा क्लब खरेदी केला होता. या क्लबने गेल्या १९ वर्षांत १९ मोठ्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. हा क्लब २०२०-२१ चा UEFA चॅम्पियन्स लीगचा (UEFA Champions League) विजेता आहे. ही युरोपमधील सर्वांत मोठी फुटबॉल लीग आहे. ब्रिटनमध्ये बंदीच्या भितीने अब्रामोविच यांनी क्लब विकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले जात आहे. ब्रिटन सरकार देशातील त्यांची मालमत्ता जप्त करणार असल्याचे समजते. त्यात चेल्सी फुटबॉल क्लबचा समावेश आहे. त्यांनी क्लबची किंमत ३० हजार कोटी एवढी ठेवली आहे.
चेल्सीची टीम गेल्या वर्षभरापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीमने गेल्या वर्षी युरोपमधील सर्वांत मोठा फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर टीमने यूएफा सुपर लीग आपल्या नावे केली. सध्या इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये टीम ५० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.