Latest

Pune : ’मुळशी’च्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ हवा तपासणी नाका

अमृता चौगुले

पिरंगुट : मुळशी तालुक्याच्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ पोलिस तपासणी नाका उभा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुण्याच्या अगदी जवळच असलेला हा तालुका म्हणजे पुण्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान होऊन बसलेला आहे. तालुक्यामध्ये प्रवेश करतानाच त्यांना अटकाव व्हावा यासाठी ही मागणी पुढे येत आहे. मुळशी तालुक्यामधील स्थानिक गुन्हेगार तसेच त्यांना साथीदार होणारे पुणे शहरातील गुन्हेगार यांना तालुक्यामध्ये येण्यास लागलीच प्रतिबंध करून त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. काही जुन्या स्थानिक गुन्हेगारांच्या मुसक्या पौड पोलिसांनी आवळल्या आहेत; परंतु त्यांच्या नावावर 'भाईगिरी' करणारे त्यांचे चेले-चपाटे सर्वसामान्य नागरिकांना धमकावून स्वतःला 'भाई' म्हणवून घेत आहेत.

संबंधित बातम्या :

सर्वात ताजी घटना म्हणजे परवाच 9 तारखेला येथील गुन्हेगारांवर पुण्यातील गुन्हेगारांनी जीवघेणा हल्ला केला त्यामध्ये ज्याच्यावर हल्ला झाला तो गुन्हेगार आलिशान 'फॉर्च्युनर'सारख्या गाडीतून फिरत होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीच्या सर्वच काचा 'डार्क काळ्या' होत्या. सामान्य माणसाची डार्क काळ्या रंगाची काच असलेली गाडी पोलिस लगेच अडवतात; परंतु हा गुन्हेगार मात्र बिनधास्त फिरत होता. अशा अनेक गुन्हेगारी घटना मुळशी तालुक्यात दिसून येतात. या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. हल्ला करणारे गुन्हेगार हे कोयता, कुर्‍हाड यासारखी हत्यारे बिनदिक्कतपणे घेऊन आले होते. दिवसाढवळ्या हा गुन्हा घडला आहे.

याच महिन्यातील 3 तारखेला जन्मठेपेची शिक्षा झालेला व 11 वर्षांपासून पॅरोलवरून फरार असलेल्या गुन्हेगारास त्याच्या दोन साथीदारांसह दोन पिस्तुले व चार काडतुसांसह गुन्हे शाखा युनिट-3 कडून अटक करण्यात आली. ही घटना पौडमधील आहे. आमदार संग्राम थोपटे, पौड पोलिस आणि इतर विभागांचे अधिकारी, पौडमधील पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेत होते, तर दुसरीकडे पुण्यातील पोलिस आरोपींना पकडून घेऊन जातात. या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत आणि त्याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पौड पोलिसांची कुमक वाढविणे गरजेचे आहे.

पौडला शंभर पोलिसांची गरज
सध्या पौड पोलिस ठाण्यामध्ये 50 ते 55 कर्मचारी तसेच अधिकारी आहेत. तालुक्यातील 120 गावाचा कारभार अवघे पन्नास पोलिस पाहत आहेत. शांतता आणि सुव्यवस्था जर ठेवायची असेल तर कमीत कमी 100 पोलिसांची गरज सध्या तालुक्याला आहे.

SCROLL FOR NEXT