नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशवासियांना दिला आहे. सरकारने जनतेला महागाईपासून वाचवावे व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी यानिमित्ताने केली. महागाई हा सर्व भारतीयांवर कर आहे, ज्यांच्या विक्रमी वाढीमुळे रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले, असे ट्विट राहुल गांधी यांनी शनिवारी केले.
कच्चे तेल १०० डॉलर्स प्रती बॅरल पर्यंत पोहचले आहे. अन्नाच्या किमती येत्या काळात २२ टक्क्यांची वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाने जागतिक पुरवठा साखळी खंडित केली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये ६.०७ टक्क्यांच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. आणि कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक किंमत-आधारित महागाई १३.११ टक्क्यांवर पोहोचली. यापूर्वी पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला होता.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये एफडी, पीपीएफ, ईपीएफ आणि महागाईशी संबंधित जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची नाही का? असा सवाल केला होता. सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. एफडी-५.१, पीपीएफ-७.१, ईपीएफ- ८.१, किरकोळ महागाई- ६.०७ आणि घाऊक महागाई-१३.११ टक्क्यांवर पोहचली असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट