Latest

Dr Raman Gangakhedkar : कोरोनाच्‍या नव्‍या व्‍हेरियंटबाबत अद्‍याप ठोस माहिती नाही, मात्र काळजी घेणे आवश्‍यक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क 

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमिक्रॉनची जगभरात चर्चा सुरु आहे. कोरोना विषाणूत झालेले बदल आणि त्‍याच्‍या तीव्रतेबाबत अद्‍याप ठोस माहिती उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे. नव्‍या व्‍हेरियंटबाबत घाबरु नका आणि त्‍याची भीतीही पसरवूही नका, अशा शब्‍दात आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर ( Dr Raman Gangakhedkar ) यांनी आपले मत
व्‍यक्‍त केले. आपल्‍याकडे परिस्‍थिती गंभीर नाही मात्र काळजी घेणे आवश्‍यक आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रमण गंगाखेडकर ( Dr Raman Gangakhedkar ) यांनी कोरोनाच्‍या नव्‍या व्‍हेरियंट आणि त्‍याच्‍या परिणामाबद्‍दल आपलं मत व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, दक्षिण आफ्रिकेतील नवा व्‍हेरियंटची भीती किती खरी आहे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे.  ओमिक्रॉनची लक्षणे कोणती हे अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. या विषाणूचा संसर्ग झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये वेगळी लक्षणे दिसतात का, हेही कळालेली नाही.  तसेच त्‍याची तीव्रता, किती जणांना रुग्‍णालयात दाखल करावे लागले. किती जणांचा मृत्‍यू झाला याबाबतही अद्‍याप ठोस माहिती नाही. त्‍यामुळे आताच यावर खूप चर्चा करुन घाबरण्‍याचे कारण नाही. जगभरात कोणत्‍याही देशात नवीन व्‍हेरिएंट दिसला की तत्‍काळ उपाययोजना केल्‍या जात आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

नियमांचे पालन करणे आवश्‍यक

कोरोनाच्‍या डेल्‍टा व्‍हेरियंट पसरत होता तेव्‍हा भारतात लसीकरणच झाले नव्‍हते. आता देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परिस्‍थिती सकारात्‍मक आहे. त्‍यामुळे नव्‍या व्‍हेरियंटबाबत घाबरुन जाण्‍याचे कारण नाही. मात्र सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्‍हणाले.

दुसरा डोस घेणे अत्‍यावश्‍यक

आपल्‍याकडे लसीकरण सकारात्‍मक झाले आहे. लस घेतली म्‍हणजे कोरोना होणार नाही, या मानसिकतेतून आता बाहेर पडणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते. रुग्‍णाचा मृत्‍यू होण्‍याचा धोका कमी होतो, हे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे ज्‍यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे त्‍यांनी विलंब न करता दुसरा डोस घ्‍यावा, असे आवाहनही त्‍यांनी केले. आपल्‍याकडे परिस्‍थिती गंभीर नाही मात्र काळजी घेणे आवश्‍यक आहे, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी स्‍पष्‍ट केले.

लहान मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस घ्‍यावी लागेल. मुलांमध्‍ये या विषाणूविरोधातील प्रतिकार शक्‍ती जास्‍त असल्‍याचे दिसले आहे. तसेच मुलांना कोरोना संसर्ग झाल्‍यानंतर गंभीर रोग होण्‍याचाही धोका कमी आहे, असेही डॉ. रमण गंगाखेडकर म्‍हणाले.

Dr Raman Gangakhedkar : कोरोना चाचणी करणे आवश्‍यक

ज्‍या व्‍यक्‍तीला कोरोनाची लक्षणं दिसत असतील त्‍यांनी तत्‍काळ चाचणी करुन त्‍याचे विलगीकरण होणे आवश्‍यक आहे. कोरोना रुग्‍णसंख्‍या कमी असेल तेवढा संसर्गाचा धोका कमी आहे, असेही ते म्‍हणाले. मागील दोन वर्ष संपूर्ण जगाने कोरोना विषाणूचा सामना केला आहे. आता हा आपल्‍या जीवनशैलीचाच भाग झाला आहे. याचा मुकाबला करण्‍यासाठी सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्‍क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही त्‍यांनी या वेळी केले.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ :  काेराेना लस : बूस्‍टर डाेसची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT